महागाव ग्रामीण रुग्णालयात रुग्णाच्या साथीदारांचा राडा; डॉक्टर, नर्सला मारहाण, प्रसूतीगृहाची तोडफोड.


महागाव, जि. यवतमाळ 
महागाव येथील ग्रामीण रुग्णालयात 18 ऑगस्ट 2026 रोजी रात्री डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करून रुग्णालयात तोडफोड केल्याची गंभीर घटना घडल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे 9.45 वाजता शेख इजराईल नामक व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत किरकोळ जखमेवर ड्रेसिंग करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात आली होती. कर्तव्यावरील स्टाफ नर्सने त्यावर उपचार करून ड्रेसिंग केले. मात्र, त्यानंतर संबंधित व्यक्तीने कर्तव्यावरील डॉक्टर व स्टाफ नर्स यांच्याशी शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
यानंतर रात्री सुमारे 11 वाजता संबंधित व्यक्ती काही साथीदारांसह दुचाकींवरून रुग्णालयात पुन्हा आल्याचे सांगण्यात येते. यावेळी डॉक्टर व नर्स यांच्याशी पुन्हा शिवीगाळ करण्यात आली. तसेच कर्तव्यावरील ब्रदर प्रशिक काळबांडे (Male Nurse) यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.
या घटनेदरम्यान रुग्णालयातील विविध ठिकाणी तोडफोड करण्यात आली असून प्रसूतीगृहाचेही नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच डॉक्टर व कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकारामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जीव मुठीत घेऊन रुग्णसेवा करायची कशी, असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिला असून रुग्णालयात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेतील संबंधित व्यक्ती व इतर आरोपींविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना ठोस सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
सुरक्षेची हमी मिळेपर्यंत रुग्णालयातील सेवा, तसेच आपत्कालीन (Emergency) सेवा बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या गंभीर घटनेची प्रशासन व पोलिसांनी तातडीने दखल घेऊन रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावे आणि दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
थोडे नवीन जरा जुने