वाशिम :प्रतिनिधी: पुरुषोतम इंगोले
वाशिम येथू जवळ असलेल्या शिरसाळा येथील भाविक नवयुवकांनी धार्मिक परंपरेचे जतन करत शिरसाळा ते मालेगाव तालुक्यातील प्रसिद्ध व पौराणिक क्षेत्र तपोवन महादेव संस्थान अशी भव्य कावड यात्रा उत्साहात काढली. या कावड यात्रेमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
शिरसाळा येथील ग्रामस्थ व नवयुवकांनी एकत्र येत पवित्र नद्यांचे जल कावडीमध्ये भरून पदयात्रेला सुरुवात केली. हातात भगवे ध्वज, 'हर हर महादेव' आणि 'जय भोलेनाथ'चा गजर करत निघालेल्या या कावड यात्रेने संपूर्ण परिसर शिवमय करून टाकला होता. या यात्रेत युवासोबतच ज्येष्ठांचाही उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
पदयात्रेदरम्यान ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून कावडधाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. शिरसाळा ते मालेगाव तालुक्यातील पौराणिक पार्श्वभूमी लाभलेल्या तपोवन महादेव मंदिरापर्यंतचा प्रवास पूर्ण केल्यानंतर, कावडधाऱ्यांनी महादेवाची रीतसर पूजा-अर्चा करून कावडीतील पवित्र जलाने भगवान महादेवाला जलाभिषेक केला.
पवित्र श्रावण सोमवार निमित्ताने आयोजित या उपक्रमातून शिरसाळा येथील तरुणांनी सामाजिक एकता आणि धार्मिक संस्कृतीचा सुंदर संदेश दिला आहे. पूजा-अर्चना आणि महाप्रसादाच्या वाटपाने या धार्मिक सोहळ्याची उत्साहात सांगता झाली.
