भाजप अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या सरचिटणीसपदी परिमल कांबळे यांची नियुक्ती.


प्रतिनिधी : स्वाती गायकवाड
अकोला, दि. १० : गेल्या अनेक वर्षांपासून दलित चळवळीत सक्रिय असलेले, स्वच्छ प्रतिमेचे आणि अभ्यासू युवा नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे परिमल कांबळे यांची भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
परिमल कांबळे यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्रातील अनुसूचित जाती समाजातील विविध घटक तसेच युवकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हिंदू दलित चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर निर्माण झालेला जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी याचा लाभ आगामी काळात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी होणार असल्याचे बोलले जात आहे.
या महत्त्वपूर्ण जबाबदारीबद्दल परिमल कांबळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश उपाध्यक्ष उपेंद्र कोठेकर, माजी आमदार संजय कुटे, आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रभारी आमदार माधवी नाईक आणि भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत गायकवाड यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
प्रदेश सरचिटणीसपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पक्षाच्या ध्येय-धोरणानुसार आणि वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटन मजबूत करण्यावर विशेष भर देणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले.
तसेच केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अनुसूचित जाती समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी शासकीय योजना समाजातील उपेक्षित, वंचित आणि गरजू घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
समाजातील सर्व घटकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा, तसेच संघटनात्मक पातळीवर कार्यकर्त्यांना अधिक सक्षम करून पक्षाचे विचार आणि विकासाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आगामी काळात विशेष प्रयत्न केले जातील, असा निर्धार परिमल कांबळे यांनी व्यक्त केला.

थोडे नवीन जरा जुने