प्रतिनिधी :स्वाती गायकवाड
कोकलगाव : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर चेतन सेवांकुर, केकत उमरा येथील दिव्यांग विद्यार्थ्यांनी स्वहस्ते तयार केलेल्या आकर्षक व कलात्मक राख्यांचा स्टॉल स्वामी विवेकानंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कोकलगाव, तालुका व जिल्हा वाशिम येथे आयोजित करण्यात आला.
या उपक्रमाला विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. राख्यांची खरेदी करून केवळ आर्थिक मदतच केली नाही, तर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कौशल्याला, मेहनतीला आणि आत्मविश्वासाला प्रोत्साहन देत सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला.
यावेळी चेतन सेवांकुर, केकत उमरा येथील दिव्यांग विद्यार्थ्यांनी सुरेल आवाजात विविध गीतांचे सादरीकरण केले. त्यांच्या मधुर व भावस्पर्शी गीतांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक आणि श्रोत्यांची मने जिंकली. त्यांच्या कलागुणांना मिळालेल्या उत्स्फूर्त दादेमुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास झळकला.
‘दिव्यांगत्व ही मर्यादा नसून संधी मिळाल्यास प्रत्येक व्यक्ती आपल्या कौशल्याने समाजात योगदान देऊ शकते,’ हा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये माणुसकी, संवेदनशीलता, सामाजिक जाणीव आणि समाजाप्रती बांधिलकी रुजविणारा हा उपक्रम राबविल्याबद्दल स्वामी विवेकानंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कोकलगाव येथील अध्यक्ष, प्राचार्य तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हातातील कौशल्याला विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहकार्याची साथ मिळाल्याने रक्षाबंधनाचा हा उपक्रम सणापलीकडे जाऊन माणुसकी, आत्मनिर्भरता आणि सामाजिक समतेचा संदेश देणारा ठरला.
