मांगुळ झनक येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान; लहु गर्जना ग्रुपचा शैक्षणिक उपक्रम कौतुकास्पद.

मांगुळ झनक येथे सामान्य ज्ञान स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 

प्रतिनिधी: स्वाती गायकवाड

 मांगुळ झनक : जिल्हा परिषद केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळा, मांगुळ झनक येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. यावेळी लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लहु गर्जना ग्रुप, मांगुळ झनक यांच्या वतीने १ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
या सामान्य ज्ञान स्पर्धेत इयत्ता चौथी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रत्येक वर्गातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमादरम्यान उपस्थित आजी-माजी पदाधिकारी, ज्येष्ठ मंडळी व मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
गेल्या तीन वर्षांपासून लहु गर्जना ग्रुप, मांगुळ झनक यांच्या वतीने गावातील शाळेत विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त सामान्य ज्ञान व स्पर्धा परीक्षांचे आयोजन करून जयंती साजरी केली जात आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या विचारांची ओळख करून देण्यासोबतच सामान्य ज्ञान आणि स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले जात आहे.
या उल्लेखनीय उपक्रमात सातत्याने योगदान देणारे लहु गर्जना ग्रुपचे सदस्य मा. श्री. पवन कांबळे यांचा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, मुख्याध्यापक बोडखे सर, शिक्षकवृंद तसेच ग्रामस्थांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये सामान्य ज्ञानाची आवड निर्माण व्हावी, स्पर्धात्मक वृत्ती वाढावी तसेच त्यांच्या शैक्षणिक व बौद्धिक विकासाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने लहु गर्जना ग्रुपच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे शिक्षक, पालक, ग्रामस्थ व उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
महापुरुषांच्या जयंती केवळ उत्सव म्हणून न साजरी करता त्यांच्या विचारांचा व कार्याचा विद्यार्थ्यांपर्यंत प्रसार करण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
या उपक्रमासाठी मांगुळ झनक केंद्राचे केंद्रप्रमुख काष्टे सर, शाळेचे मुख्याध्यापक बोडखे सर, तसेच राऊत सर, झुंजारे सर, सावळे सर, बोरकर सर, गवई सर व बाजड सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, भविष्यातही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा शैक्षणिक, ज्ञानवर्धक व प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

थोडे नवीन जरा जुने