गावकऱ्यांनी केला अभिनंदनचा वर्षाव; मुलीने दिले यशाचे श्रेय गुरुजन व वडिलांना
रिसोड प्रतिनिधी (जि. वाशिम)
रिसोड तालुक्यातील मंगुळ झनक येथील शेख रुक्सार शेख मुक्तार हिने गावातील पहिली महिला पोलीस कॉन्स्टेबल होण्याचा मान मिळवला आहे. तिच्या या यशाबद्दल गावकऱ्यांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.
रुक्सार हिने आपल्या मनोगतात सांगितले की, पोलीस भरतीसाठीचा तिचा चार वर्षांचा प्रवास अत्यंत खडतर होता. अनेक अडथळे व अडचणींना सामोरे जात तिने अथक परिश्रमाच्या जोरावर हे यश संपादन केले.
या प्रवासात तिला ‘घे भरारी’ संस्थेचे संचालक श्री. गोपाल मानिकराव वाडे तसेच गायकवाड क्लासेसचे संचालक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे योग्य दिशा मिळाली आणि यशाचा मार्ग सुकर झाला, असे तिने नमूद केले.
तिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व गुरुजनांना देत, त्यांच्या पाठिंब्यामुळेच हे स्वप्न साकार झाल्याचे सांगितले. “ही वर्दी केवळ नोकरी नसून माझ्या संघर्षाचे सुवर्ण फळ आहे,” असे भावनिक उद्गारही तिने व्यक्त केले.
यावेळी तिने देशाची प्रामाणिकपणे सेवा करण्याची शपथ घेतली. तसेच समाजातील मुलींनी तिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षण व करिअरकडे वाटचाल करावी, असे आवाहनही केले.

0 टिप्पण्या