रक्षक झाला राक्षस ! जवानांने केली ८ महिन्याच्या गर्भवती पत्नीची हत्या.

मन हेलावून टाकणारी घटना, कारंजा परिसर हादरला! निर्दयी पणाचा कहर, गर्भातील निष्पाप बाळही सुरक्षित नाही.

 कारंजा प्रतिनिधी | दि. ९ ऑगस्ट २०२६.

कारंजा शहरातील शिवनगर परिसरात आठ महिन्यांची गर्भवती असलेल्या विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांनी तिचा पती, आर्मी जवान ज्ञानेश्वर मदने याला अटक केली असून, त्याच्यासह त्याच्या आई-वडिलांविरुद्धही खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ६ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास शिवनगर परिसरात ही घटना घडली. मृत महिला आठ महिन्यांची गर्भवती होती. सुरुवातीला तिचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाल्याचे समोर आले. त्यामुळे कारंजा शहर पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी पती ज्ञानेश्वर मदने याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, पत्नीचा दोरीच्या साहाय्याने गळा आवळून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात पतीसह त्याच्या आई-वडिलांचीही भूमिका तपासण्यात येत असून, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, आरोपी पतीचे अन्य महिलेसोबत कथित संबंध असल्याचा संशय आणि त्यातून पत्नीचा अडथळा निर्माण होत असल्याची बाब तपासात समोर आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मात्र, या सर्व बाबींची कायदेशीर पडताळणी आणि पुढील तपास सुरू आहे.
या घटनेत गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच कारंजा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थितीचा पंचनामा करून उपलब्ध परिस्थितीजन्य व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपासाला गती दिली.
या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असून, गुन्ह्याच्या संपूर्ण पार्श्वभूमीचा आणि प्रत्येक आरोपीच्या भूमिकेचा तपास पोलीस करीत आहेत. पुढील तपासानंतरच या घटनेमागील नेमके कारण आणि गुन्ह्यातील सर्वांची भूमिका स्पष्ट होणार आहे.
पत्रकाराची नोंद
विवाहातील मतभेद, संशय आणि कौटुंबिक वादातून हिंसक घटना घडणे ही गंभीर सामाजिक समस्या आहे. विशेषतः गर्भवती महिलेचा संशयास्पद मृत्यू ही अत्यंत संवेदनशील बाब असून, या प्रकरणात निष्पक्ष तपास होऊन सत्य समोर येणे आणि दोषींवर कायद्यानुसार कारवाई होणे आवश्यक आहे.


थोडे नवीन जरा जुने