Ad Code

एम.सी.ई.डी.च्या प्रशिक्षणातून पशुपालन व्यवसायाला नवी दिशा

आधुनिक तंत्रज्ञान, वैज्ञानिक व्यवस्थापन आणि स्वयंरोजगार संधींचा उलगडा; प्रमाणपत्र वितरणासह उत्साहात समारोप.

वाशिम प्रतिनिधी

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम.सी.ई.डी.), वाशिम यांच्या वतीने आयोजित पाच दिवसीय शेळीपालन, कुक्कुटपालन व दुग्धव्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमाचा उत्साहात समारोप करण्यात आला. समारोप प्रसंगी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या प्रशिक्षणातून पशुपालन व्यवसायाला नवी दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

दि. २ ते ६ जून २०२६ या कालावधीत राणा हॉल, अकोला नाका, वाशिम येथे आयोजित प्रशिक्षणात युवक, शेतकरी, महिला बचत गट सदस्य आणि उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. प्रशिक्षणादरम्यान आधुनिक तंत्रज्ञान, वैज्ञानिक व्यवस्थापन आणि पशुपालनातील व्यवसाय संधी याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
मार्गदर्शक म्हणून पशुधन विकास अधिकारी डॉ. दिनेश किसनराव चौधरी यांनी शेळीपालनातील विविध जाती, निवास व्यवस्था, संतुलित आहार, रोगनियंत्रण, लसीकरण, प्रजनन व्यवस्थापन, चारा नियोजन तसेच उत्पादनक्षमता वाढविण्याच्या आधुनिक पद्धतींची माहिती दिली. कुक्कुटपालन व दुग्धव्यवसायातील आर्थिक नियोजन, बाजारपेठ व्यवस्थापन आणि व्यवसाय विस्ताराच्या संधींवरही त्यांनी मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणात पशुपालन व्यवसायातील जोखीम व्यवस्थापन, शासकीय योजना, बँक कर्ज, अनुदान योजना आणि व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन मिळविण्याच्या पद्धतींबाबत प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष उदाहरणांसह माहिती देण्यात आली.
समारोप कार्यक्रमात प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी सहभागी प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. ग्रामीण भागातील युवक, महिला आणि शेतकऱ्यांसाठी पशुपालन हा रोजगार व उत्पन्नाचा प्रभावी स्रोत ठरू शकतो, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
प्रकल्प अधिकारी गौरव इंगळे यांनी सांगितले की, “एम.सी.ई.डी.च्या माध्यमातून आयोजित अशा प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे ग्रामीण युवकांमध्ये उद्योजकतेची भावना निर्माण होत असून आधुनिक तंत्रज्ञान व वैज्ञानिक पद्धतींच्या साहाय्याने पशुपालन व्यवसाय अधिक सक्षम, शाश्वत आणि फायदेशीर बनविता येतो. प्रशिक्षणार्थींनी मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण कराव्यात.”
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशिक्षण समन्वयक अमित इंगोले, तज्ज्ञ मार्गदर्शक आणि प्रशिक्षणार्थींचे विशेष योगदान लाभले. संपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सहभागींच्या ज्ञानात व कौशल्यात लक्षणीय वाढ झाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या