Ad Code

तंबाखू नियंत्रण कायद्यांतर्गत वाशिममध्ये 22 पानटपरी धारकांवर दंडात्मक कारवाई

वाशिम : दि. 07/05/2026

  राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय वाशिम यांच्या वतीने शहरात तंबाखूविरोधी विशेष धाड सत्र मोहीम राबविण्यात आली.
ही कारवाई जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे तसेच अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अविनाश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये आरोग्य विभाग, पोलीस विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच मराठवाडा ग्रामीण विकास संस्था छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त सहभागाने ही मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पाटणी चौक, रिसोड नाका, शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय, लाखाळा, अकोला नाका तसेच आर्य कॉलेज परिसरात तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ अधिनियम (कोटपा) 2003 मधील
कलम 4 (सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान बंदी)
कलम 6 अ (अल्पवयीनांना विक्री मनाई)
कलम 6 ब (शाळा-महाविद्यालय परिसरात विक्री प्रतिबंध)
या तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या एकूण 22 पानटपरी धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण ₹5,200/- दंड वसूल करण्यात आला.
या कारवाईत जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार डॉ. आदित्य पांढरकर, मानसशास्त्रज्ञ राम सरकटे, सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण धाडवे, अन्न सुरक्षा अधिकारी व्ही. जे. राठोड, MGVS चे विभागीय व्यवस्थापक मंगेश गायकवाड तसेच पोलीस कॉन्स्टेबल जगदीश महाले व गणेश महाले यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले की, तंबाखूमुक्त समाज निर्मितीसाठी अशा प्रकारच्या धाड मोहिमा पुढेही सातत्याने राबविण्यात येतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या