Ad Code

वाशीम उड्डाणपुलाजवळ भीषण ट्रॅफिक जॅम; पुसद नाका पर्यंत वाहनांच्या रांगा, ट्राफिक नियम बसले धाब्यावर.


वाशीम प्रतिनिधी:
वाशीम शहरातील उड्डाणपुलालगतचे सर्व्हिस रोड बंद असल्यामुळे शहरात वारंवार ट्रॅफिक जॅमची गंभीर समस्या निर्माण होत आहे. पुसद नाका पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.
या ठिकाणी वाहतूक पोलीस ट्राफिक सुरळीत करण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक वेळा वाहनांच्या रांगा 30 मिनिटांहून अधिक काळ जागीच उभ्या राहत असून, नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या गर्दीमुळे मोठ्या वाहनांकडून मोटारसायकलस्वार, पायदळ चालणारे नागरिक यांना चिरडून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
तसेच शाळकरी मुलं आणि परीक्षा देण्यासाठी जाणारे विद्यार्थी या ट्रॅफिकमुळे मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचण्यात अडथळे निर्माण होत असल्याने पालकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, या ट्रॅफिक जॅममध्ये रुग्णवाहिका अडकण्याच्या घटनाही समोर येत असून, तात्काळ सेवा देणारी वाहने वेळेवर पोहोचू शकत नाहीत, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
याशिवाय, ट्रॅफिकमध्ये वाहनधारकांमध्ये अनेकदा वादावादी व चकमकी होत असल्याचेही दिसून येत आहे. ही परिस्थिती पुढे जाऊन गंभीर किंवा विकृत घटनांमध्ये बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाकडे उड्डाणपुलाचे सर्व्हिस रोड तात्काळ सुरू करण्याची, पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची, उड्डाणपुलावर लाईट व लॅम्प बसवण्याची तसेच पुसद नाका परिसरात अतिरिक्त वाहतूक पोलीस नियुक्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.
मात्र, या सर्व मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या