उदगीर : उदगीर येथील मातंग समाजातील होतकरू विद्यार्थी आर्यन केदासे यांनी इंग्रजी माध्यमातून दहावी शालांत प्रमाणपत्र परीक्षेत 100 पैकी 100 गुण संपादन करून ऐतिहासिक यश मिळविले आहे. त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून सोशल मीडिया व प्रसार माध्यमांमधून त्यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.
आर्यन केदासे यांच्या यशामुळे मातंग समाजातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत मोठी जिद्द व क्षमता असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. प्रतिकूल परिस्थिती, शैक्षणिक मर्यादा आणि आरक्षणातील विविध प्रश्न असूनही मातंग समाजातील तरुण शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करत आहेत, असे चित्र या यशातून स्पष्ट झाले आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना आंतरराष्ट्रीय संत बौद्धिक मंच संघटन महाराष्ट्र राज्याचे महामंत्री माननीय श्री कैलासजी थोरात यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, “आर्यन केदासे यांचे यश हे संपूर्ण मातंग समाजासाठी प्रेरणादायी आहे. समाजातील तरुण शिक्षण घेण्यास उत्सुक असून योग्य संधी मिळाल्यास ते मोठी प्रगती करू शकतात. मात्र अनेक वर्षांपासून आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या प्रश्नामुळे मातंग समाजातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने उपवर्गीकरणाचा निर्णय घेतल्यास हजारो मातंग समाजातील युवक-युवतींना शिक्षण व नोकरीच्या संधी उपलब्ध होतील आणि समाज मुख्य प्रवाहात अधिक सक्षमपणे उभा राहील.”
आर्यन केदासे यांच्या यशामुळे उदगीर शहरासह संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

0 टिप्पण्या