Ad Code

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाभूळगाव येथे कार्यक्रम उत्साहात संपन्न

प्रतिनिधी महादेव आवारे :

बाभूळगाव : जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाभूळगाव येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला ग्रामपंचायत बाभूळगावच्या सरपंच लक्ष्मीबाई बाळकृष्ण ढोबळे, उपसरपंच ज्ञानेश्वर भोयर,ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका तराळे मॅडम, आरोग्य सेविका कामिनी कांबळे मॅडम तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. यावेळी अंगणवाडी सेविका दुर्गा ताई वऱ्हाडे, आशा सेविका रमाबाई आडोळे, लक्ष्मी नागरे व ग्रामस्थ  व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व पूजन करून करण्यात आली.

यावेळी मुख्याध्यापिका तराळे मॅडम यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना व उपस्थितांना मार्गदर्शन केले. महिला सक्षमीकरणाबाबत आपले विचार मांडत त्यांनी जिल्हा परिषद शाळेच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. शाळेत सुरू असलेली प्रयोगशाळा, परसबाग, संगणक प्रयोगशाळा आदी उपक्रमांविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली.

आरोग्य सेविका कामिनी कांबळे मॅडम यांनी महिलांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की, महिलांनी केवळ आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम होणे म्हणजे महिला सक्षमीकरण नव्हे, तर आरोग्यदृष्ट्याही सक्षम असणे तितकेच आवश्यक आहे. यासाठी मुलींचे अल्पवयीन विवाह टाळणे, महिलांमधील वाढणारे ॲनिमियाचे प्रमाण कमी करणे, दोन बाळांमधील योग्य अंतर ठेवणे, गरोदर मातांना सकस आहार मिळणे, कुपोषण टाळणे तसेच मासिक पाळी व्यवस्थापन याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच किशोरवयीन मुलींचे आरोग्य, गर्भवती मातांची काळजी, चाळीशी नंतर महिलांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा आणि किशोरवयीन मुलांमध्ये वाढणारी व्यसनाधीनतेची प्रवृत्ती याबाबतही त्यांनी उपस्थितांना माहिती दिली.

या कार्यक्रमास शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या