ग्रामीण रुग्णालय मालेगाव येथे एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीची सभा संपन्न.

 

मालेगाव, दि. ७ सप्टेंबर २०२६ : ग्रामीण रुग्णालय, मालेगाव येथे एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीची सभा आमदार श्री. अमित सुभाषराव झनक यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. यावेळी तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचा विविध बाबींवर सविस्तर आढावा घेण्यात आला.
सभेस तालुका आरोग्य अधिकारी तथा सहसचिव डॉ. अश्विनी खासबागे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वाहुळे तसेच तालुक्यातील विविध आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
JSY योजनेचा आढावा
सभेत सन २०२५-२६ मधील जननी सुरक्षा योजना (JSY) अंतर्गत देण्यात आलेल्या लाभांचा आढावा घेण्यात आला. डॉ. अश्विनी खासबागे यांनी एकूण प्रसूती तसेच तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रनिहाय प्रसूतीचे प्रमाण याबाबत माहिती सादर केली.
माता व बाल आरोग्यावर चर्चा
कमी वजनाच्या बालकांची संख्या, अर्भक मृत्यू तसेच माता मृत्यूची आकडेवारी यावेळी सादर करण्यात आली. मातांना आवश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिरांचे नियोजन
कुटुंब कल्याण शस्त्रक्रियांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. नागरिकांना या सेवांचा लाभ मिळावा यासाठी लवकरच शस्त्रक्रिया शिबिरे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. खासबागे यांनी दिली.
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा आढावा
सभेत NQAS, NCD तसेच TB मुक्त भारत अभियानाबाबत माहिती देण्यात आली. श्री. साळुंके यांनी टीबीमुक्त भारत कार्यक्रमाची माहिती उपस्थितांना दिली. तसेच साथरोगांच्या पार्श्वभूमीवर दूषित पाण्याचे नमुने आढळलेल्या गावांचा आढावाही घेण्यात आला.
‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान
‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत मालेगाव शहरात करण्यात आलेल्या कुष्ठरोग सर्वेक्षणाचा आढावा घेण्यात आला. सर्वेक्षणात आढळून आलेल्या कुष्ठरुग्णांबाबत श्री. गोविंद पाटील यांनी माहिती दिली.
बांधकामासह ग्रामीण रुग्णालयाची पाहणी
उपकेंद्राच्या सुरू असलेल्या बांधकामाबाबत आमदार श्री. अमित झनक यांनी संबंधितांकडून माहिती घेतली. तसेच त्यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या कामकाजाचाही आढावा घेत रुग्णांना दर्जेदार व वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या सक्त सूचना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.
यानंतर आमदार श्री. झनक यांनी ग्रामीण रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करून रुग्णालयातील विविध विभागांची माहिती घेतली.
आभार प्रदर्शन
सभेच्या शेवटी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी खासबागे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी डॉ. वाहुळे यांच्या उपस्थितीत आमदार श्री. अमित सुभाषराव झनक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
आरोग्य सेवांचा दर्जा सुधारून नागरिकांना अधिक प्रभावी सेवा देण्यावर सभेत विशेष भर देण्यात आला.
थोडे नवीन जरा जुने