दरवर्षी ८ मार्च रोजी संपूर्ण जगभर International Women’s Day अर्थात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महिलांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी, त्यांच्या संघर्षाची आठवण ठेवण्यासाठी आणि समाजातील त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
इतिहासात अनेक महान महिलांनी समाज सुधारण्यासाठी आणि मानवतेच्या कल्याणासाठी मोलाचे कार्य केले आहे. त्यामध्ये महान समाजसुधारक (सावित्रीबाई फुले), शौर्याचे प्रतीक (झाशीची राणी लक्ष्मीबाई), न्यायप्रिय व लोककल्याणकारी राज्यकारभार करणाऱ्या (अहिल्याबाई होळकर), तसेच (माता जिजाऊ) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवून स्वराज्याची प्रेरणा दिली. मानवतेची सेवा करणाऱ्या (मदर तेरेसा) यांचे कार्य जगभर प्रसिद्ध आहे. तसेच (माता रमाई / रमाबाई आंबेडकर) यांनीही सामाजिक कार्यात महत्त्वाचे योगदान दिले.
आजच्या आधुनिक युगात महिलांनी अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती (प्रतिभाताई पाटील) तसेच विद्यमान राष्ट्रपती (द्रौपदी मुर्मू) या देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाल्या. विज्ञान व अंतराळ क्षेत्रात (कल्पना चावला) यांनी भारताचे नाव जगभर पोहोचवले, तर क्रीडा क्षेत्रात (मेरी कोम) यांनी बॉक्सिंगमध्ये जागतिक स्तरावर भारताचा गौरव वाढवला,सिंधुताई सपकाळ, राजमाता जिजाऊ.
आज महिला उद्योग, शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान, प्रशासन, पत्रकारिता, राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात मोठ्या आत्मविश्वासाने पुढे जात आहेत. त्यामुळे आज महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत, हे स्पष्टपणे दिसून येते.
मात्र, या प्रगतीसोबतच काही गंभीर प्रश्नही समाजासमोर उभे राहतात. खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण झाले आहे का? आज सर्व महिला सुरक्षित आहेत का? प्रत्येक महिलेला समानतेचा दर्जा मिळाला आहे का? या प्रश्नांची उत्तरे शोधली तर काही कटू वास्तव समोर येते.
आज विचार केला तर ८ मार्च हा जागतिक महिला दिन असूनही आजच्या आकडेवारीकडे पाहिले तर महिलांवर अत्याचार, बलात्कार, छळ तसेच हुंडाबळीच्या घटना घडत असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमधून समोर येताना दिसतात. लहान बालिकांपासून ते वृद्ध महिलांपर्यंत अनेक जणी असुरक्षित असल्याचे चित्र समाजात दिसते. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे.
म्हणूनच महिला दिन फक्त औपचारिक कार्यक्रमांपुरता मर्यादित न राहता समाजाने आत्मपरीक्षण करण्याचा दिवस असायला हवा. महिलांचा खरा सन्मान तेव्हाच होईल जेव्हा प्रत्येक घरामध्ये महिलांना समान दर्जा, प्रेम, आदर आणि सुरक्षितता मिळेल.
प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की आपल्या घरातील आई, बहीण, पत्नी किंवा मुलगी सुरक्षित असावी. परंतु हेही लक्षात घेतले पाहिजे की ज्या महिलांवर अन्याय होतो त्या सुद्धा कोणाच्या तरी मुली, बहिणी, आई किंवा पत्नीच असतात. त्यामुळे प्रत्येकाने परस्त्रीचा आदर करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.
जर प्रत्येक घरामध्ये महिलांविषयी आदर, समानता आणि संवेदनशीलतेचे संस्कार रुजले, तर समाजात निश्चितच सकारात्मक बदल घडू शकतो.
जागतिक महिला दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा उत्सव नसून तो महिलांच्या सन्मानाचा, सुरक्षिततेचा आणि समानतेचा विचार करण्याचा दिवस आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त जगातील सर्व महिलांना मनःपूर्वक शुभेच्छा. 🌸
एम.एस.डब्ल्यू., पत्रकारिता पदवीधर, एल.एल.बी.
संपादक
यु.बी.एन. न्यूज नेटवर्क आवाज महाराष्ट्राचा
आवाज टीव्ही 10 महाराष्ट्र

0 टिप्पण्या