Ticker

6/recent/ticker-posts 🔥 Breaking News | 🔔 Subscribe Awaj TV10 Marathi

Ad Code

ना.ना. मुंदडा विद्यालय मालेगावच्या 2004–05 दहावी बॅचचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

मालेगाव (जि. वाशिम) :

स्थानिक ना.ना. मुंदडा विद्यालय, मालेगाव येथील सन 2004–2005 च्या माजी दहावीतील विद्यार्थी-विद्यार्थिनींचे स्नेहसंमेलन रविवार, दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी विद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास सेवानिवृत्त शिक्षकवृंद, माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुमारे 21 वर्षांनंतर पुन्हा एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा दिला. दैनंदिन धावपळीच्या जीवनामुळे अनेक वर्षांपासून एकमेकांची भेट न झालेल्या मित्र-मैत्रिणींना या कार्यक्रमामुळे पुन्हा भेटण्याची संधी मिळाली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या वतीने करण्यात आले.

या वेळी विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक श्री. आघमकर सर, संस्थेचे अध्यक्ष अभिषेक मुंदडा सर, मुख्याध्यापक श्री. उंटवाल सर, तसेच श्री. कुबडे सर, श्री. रोडे सर, श्री. जोशी सर, श्री. देशमुख सर, सौ. मुंदडा मॅडम, सौ. देवळे मॅडम, सौ. राजपूत मॅडम यांच्यासह त्या काळातील शिक्षक व कर्मचारीवृंद उपस्थित होते.

मान्यवर तसेच माजी विद्यार्थ्यांच्या मनोगतांनी कार्यक्रमाला भावनिक रंग चढला. त्यानंतर सर्व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी आपल्या जुन्या वर्गात जाऊन त्या काळातील शिक्षकांकडून मार्गदर्शन घेतले. शिक्षकांनी दिलेल्या मोलाच्या संदेशामुळे उपस्थितांचे मन तृप्त झाले.

कार्यक्रमादरम्यान सकाळी नाश्ता व दुपारी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर संगीत खुर्ची, रस्सीखेच, धप्पा-कुटी, गाण्याच्या भेंड्या आदी खेळ खेळण्यात आले. शेवटी डीजेच्या तालावर सर्वांनी मनसोक्त नृत्याचा आनंद घेतला.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी अनेक माजी विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत भावनांचे अश्रू दिसून आले. जिवलग मित्र-मैत्रिणींनी एकमेकांना मिठी मारत भावुक निरोप दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. नेहा काळे मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन निखिल बांडे व दीपक आंधळे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले.


Post a Comment

0 Comments