पोलिसांनी घेतले आरोपीला ताब्यात, चौकशी सुरु. तिन दिवसाची पोलीस कोठडी.
वाशिम | प्रतिनिधी
वाशिम जिल्ह्यातील काटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक दिलीप बोरकर यांच्यावर अल्पवयीन विद्यार्थिनींशी लैंगिक गैरवर्तन व छेडछाडीचे गंभीर आरोप झाल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गावातील एका महिलेने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली. तक्रारीमध्ये इयत्ता तिसरी व चौथीतील काही विद्यार्थिनींशी शिक्षकाने गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित प्रकार मुली लहान वयात असल्यापासून सुरू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आल्याची माहिती आहे.
तक्रारीनंतर पोलिसांनी शाळेत भेट देऊन संबंधित विद्यार्थिनींची इन-कॅमेरा जबानी/स्टेटमेंट नोंदविल्याची माहिती आहे. या प्रकरणातील पीडित विद्यार्थिनींची नेमकी संख्या अद्याप स्पष्ट झालेली नसून, तक्रारीमध्ये एका मुलीसह इतरही मुलींचा उल्लेख असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीदरम्यान गैरवर्तन केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहितेतील कलम 75 तसेच POCSO कायद्यातील कलम 8, 10 आणि 12 अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. आरोपीला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, अल्पवयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नुकताच ५ सप्टेंबर रोजी देशभर शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षकाला ज्ञानदाता, मार्गदर्शक आणि पालकत्वाची भूमिका निभावणारा म्हणून समाजात मानाचे स्थान आहे. अशा पार्श्वभूमीवर शिक्षकावर झालेले हे गंभीर आरोप शिक्षकी पेशाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरत आहेत.
या प्रकरणामुळे विद्यार्थिनींच्या पालकांमध्येही चिंता वाढली असून, शाळांमध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. तक्रारदार महिला व संबंधित मुलींनी दाखवलेल्या धाडसामुळे हा प्रकार समोर आल्याची चर्चा परिसरात आहे.
या प्रकरणातील सर्व आरोपांची सत्यता तपासाअंती आणि न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्ट होणार आहे. आरोपीला कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
या प्रकरणाच्या पुढील तपासात आणखी कोणते तथ्य समोर येते आणि या घटनेला पुढे कोणते वळण मिळते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
