वाशीम प्रतिनिधी :
बाभूळगाव, दि. १ ऑगस्ट : बाभुळगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात व सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आरोग्यसेविका कामिनी महादेव आवारे उपस्थित होत्या. तसेच प्रा. महादेव सुभाष आवारे (संपादक, दैनिक जनप्रहार), सामाजिक कार्यकर्ते मदन कांबळे, दत्तराव वैरागडे, रतिराम कांबळे, विजय रणबावळे, विलास रणबावळे, मिराबाई कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून करण्यात आली. यानंतर प्रमुख अतिथी कामिनी आवारे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधनपर व्याख्यान देत त्यांच्या विचारांचा समाजाने अंगीकार करण्याचे आवाहन केले.
प्रा. महादेव सुभाष आवारे यांनी आपल्या भाषणात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य, विचार आणि सामाजिक कार्य यावर सविस्तर प्रकाश टाकला. त्यांनी मातंग समाजातील पालकांनी आपल्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करावे, तसेच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शासकीय सेवेत प्रवेश मिळवून समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन केले. अण्णाभाऊ साठे यांचे विचार घराघरात पोहोचविण्यासाठी समाजात जनजागृतीबरोबरच शिक्षणाची जोड देणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
यावेळी उपस्थित इतर सामाजिक कार्यकर्त्यांनीही अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव करत आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने झाला.
