ग्रामीण शिक्षणाचा नवा चेहरा; जिल्हा परिषद शाळांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी


वाशिम : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणेच दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे. प्रतिभावान व उपक्रमशील शिक्षक, शाळा व्यवस्थापन समित्या, स्थानिक स्वराज्य संस्था, तालुका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून ग्रामीण शिक्षणाचा चेहरामोहरा बदलत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
महात्मा गांधी यांनी दिलेल्या ‘खेड्याकडे चला’ या संदेशाला आधुनिक शैक्षणिक संदर्भ देत आज ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळाच ज्ञान, तंत्रज्ञान आणि गुणवत्तेची नवी केंद्रे बनत आहेत. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला योग्य दिशा आणि संधी मिळाल्यास ते कोणत्याही शहरी किंवा खासगी शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा कमी नाहीत, हे जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांच्या कामगिरीतून अधोरेखित होत आहे.
पूर्वी ग्रामीण भागातील शाळांकडे केवळ पारंपरिक शिक्षण देणाऱ्या संस्था म्हणून पाहिले जात होते. मात्र, बदलत्या शैक्षणिक प्रवाहासोबत जिल्हा परिषद शाळांनीही आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे. डिजिटल शिक्षण, डिजिटल टीव्ही पॅनेल, संगणक, टॅब, आयपॅड, संगणक प्रयोगशाळा, टिंकरिंग लॅब, सुसज्ज ग्रंथालय, शैक्षणिक साहित्य आणि आकर्षक शालेय परिसर अशा विविध सुविधांमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध होत आहेत.
विशेष म्हणजे, केवळ भौतिक सुविधा निर्माण करण्यापुरते हे परिवर्तन मर्यादित नसून अध्यापन पद्धतीतही मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. नाविन्यपूर्ण शिक्षक विविध शैक्षणिक संकल्पना व्हिडिओ, ऑडिओ, डिजिटल साधने, कृतीआधारित शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजावून सांगत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, सर्जनशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास निर्माण होत आहे.
याचबरोबर जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. शिष्यवृत्ती परीक्षा, NMMS, नवोदय प्रवेश परीक्षा, विविध विज्ञान व प्रज्ञाशोध परीक्षा, ऑलिम्पियाड तसेच इतर स्पर्धात्मक परीक्षांमध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांचा वाढता सहभाग ही बदलत्या शैक्षणिक वातावरणाची सकारात्मक परिणती आहे.
ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, त्याच्या शैक्षणिक तसेच सामाजिक गरजा स्थानिक पातळीवर पूर्ण व्हाव्यात आणि त्याला भविष्यातील स्पर्धात्मक जगासाठी सक्षम करता यावे, या उद्देशाने शिक्षक सातत्याने विविध उपक्रम राबवत आहेत.
या परिवर्तनामध्ये प्रशासनाची भूमिका देखील महत्त्वपूर्ण ठरत आहे. जिल्हा प्रशासन, पंचायत समिती स्तरावरील प्रशासन, ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षक यांच्या समन्वयातून शाळांच्या भौतिक तसेच शैक्षणिक विकासाला चालना मिळत आहे.

थोडे नवीन जरा जुने