निरोगी शरीरासाठी तंबाखू मुक्ती आणि खंबीर मनासाठी मानसिक आरोग्य काळाची गरज.

दिव्य मातृभूमि नेटवर्क :

जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम व जिल्हा तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा रुग्णालय वाशीम यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल कावरखे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अविनाश पुरी आणि बाह्य संपर्क वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रसाद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रियदर्शनी माध्यमिक व कनिष्ठ महा विद्यालय आसेगाव पेन ता. रिसोड येथे मानसिक आरोग्य व तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमात जिल्हा तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण धाडवे यांनी विद्यार्थ्यांना तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या मुख कर्करोग ,मुख कर्क रोगाची प्राथमिक लक्षणे आरोग्यविषयक दुष्परिणामांची सविस्तर माहिती दिली. लहान मुलांनी आई-वडिलांसाठी किंवा इतर व्यक्तींसाठी दुकानातून तंबाखूजन्य पदार्थ आणून देऊ नयेत. लहान वयात तंबाखूचे व्यसन लागण्यामागे मित्रांचा दबाव, कुतूहल, अनुकरण, घरातील किंवा परिसरातील व्यक्तींचे तंबाखू सेवन तसेच तंबाखूजन्य पदार्थांची सहज उपलब्धता हे घटक कारणीभूत ठरू शकतात, यावेळी तंबाखू नियंत्रणासाठी असलेल्या COTPA कायद्याबाबतही विद्यार्थ्यांना प्राथमिक माहिती देण्यात आली.
मनोविकृती सामाजिक कार्यकर्ते सुनील सुर्वे यांनी विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य म्हणजे काय, मानसिक आजार,आजारांची लक्षणे, कारणे व उपचारपद्धती याबाबत मार्गदर्शन केले. मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला व उपचार घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हा रुग्णालय वाशीम मार्फत उपलब्ध असलेल्या मानसिक आरोग्य सेवा, औषधोपचार, समुपदेशन, व्यसनमुक्ती कार्यक्रम तसेच दिव्यांग प्रमाणपत्रासंबंधी सेवा याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.तसेच विद्यार्थ्यांना लहान मुलांमध्ये आढळणाऱ्या मानसिक व विकासात्मक समस्या, स्वमग्नता,ADHD,मिरचीचे झटके मतिमंदत्व, अध्ययन क्षमता व अध्ययनातील अडचणी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मानसिक आरोग्याशी संबंधित अडचणी असल्यास त्या लपवू नयेत, तर पालक, शिक्षक किंवा तज्ज्ञ व्यक्तींशी संवाद साधावा, असा संदेश देण्यात आला.‘ टेली-मॅनस’च्या १४४१६ क्रमांकावर समुपदेशनाची सुविधा उपलब्ध असून काही समस्या असल्यास संपर्क करावा असे आव्हान करण्यात आले .
कार्यक्रमास प्रियदर्शनी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय आसेगाव पेन येथील मुख्याध्यापिका श्रीमती.आम्रपाली खंडारे , हेंबाडे सर ,चंदनशिव सर ,नालेगावकर सर, गायकवाड सर, मवाळ सर ,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने