गांधीजींच्या स्वप्नातील खेडे, आज शिक्षणाच्या नव्या वाटेवर; जिल्हा परिषद शाळांची नाविन्यपूर्ण भरारी.

प्रतिनिधी |स्वाती गायकवाड
वाशिम : महात्मा गांधीजींच्या ‘ खेड्याकडे चला ’ या विचाराला आधुनिक शिक्षणाची जोड देत ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा आज गुणवत्तापूर्ण व नाविन्यपूर्ण शिक्षणाची प्रभावी केंद्रे म्हणून पुढे येत आहेत. याच परिवर्तनाचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, साखरा, जि. वाशिम ही शाळा होय.
शाळेतील शिक्षकांच्या नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले सातत्यपूर्ण प्रयत्न आणि विविध स्पर्धा परीक्षांसाठी केलेले मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शाळेच्या गुणवत्तेची दखल घेत आजूबाजूच्या ग्रामीण भागासह शहरी भागातील विद्यार्थीही येथे शिक्षण घेण्यासाठी येत असल्याचे चित्र आहे.
नुकत्याच झालेल्या वाशिम जिल्ह्याच्या शैक्षणिक दौऱ्यादरम्यान शाळेतील शिक्षक तसेच जिल्हा शिक्षण प्रशासनाच्या माध्यमातून साखरा शाळेची संपूर्ण यशोगाथा, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी याबाबत शिक्षणमंत्र्यांनी माहिती जाणून घेतली. या कार्याची सविस्तर माहिती घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंत्रालयातून शाळेतील शिक्षकांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून, “लवकरच साखरा जिल्हा परिषद शाळेला स्वतः भेट देण्याचा माझा मनोदय आहे,” अशी भावना त्यांनी स्वतःहून व्यक्त केली.
साखरा शाळेच्या गुणवत्तापूर्ण कार्याची दखल घेत महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री माननीय दादासाहेब भुसे यांनी शाळेतील शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती तसेच वाशिम जिल्ह्याच्या शिक्षण प्रशासनाचे विशेष कौतुक केले. ग्रामीण व आकांक्षी जिल्ह्यातील शाळा असूनही गुणवत्तापूर्ण शिक्षण, नाविन्यपूर्ण अध्यापन आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या क्षमतांना योग्य दिशा देण्याचे काम होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
या कार्यामागे शाळेतील शिक्षकांची कल्पकता, शाळा व्यवस्थापन समितीचा सक्रिय सहभाग तसेच जिल्हा व तालुका प्रशासनाचे मार्गदर्शन आणि सहकार्य महत्त्वाचे ठरले आहे. इतक्या उत्कृष्ट पद्धतीने जिल्हा परिषद शाळा उभी करण्यासाठी शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांचेही त्यांनी तोंडभरून कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्व शिक्षक व अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
साखरा शाळेचे कार्य केवळ एका शाळेपुरते मर्यादित न राहता राज्यातील इतर जिल्हा परिषद शाळांसाठी प्रेरणादायी ठरावे, अशी अपेक्षा व्यक्त करत लवकरच साखरा जिल्हा परिषद शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षक बंधू-भगिनींचा सन्मान करण्याचाही मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे.
या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या शाळांनी एकमेकांकडून प्रेरणा घेऊन आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांना आधुनिक, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. साखरा शाळेचे कार्य हे एका शाळेचे यश म्हणून न पाहता ग्रामीण शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी प्रेरणादायी मॉडेल म्हणून विकसित व्हावे, हा या गौरवामागील व्यापक दृष्टिकोन आहे.
साखरा शाळेच्या या वाटचालीतून गांधीजींच्या ‘खेड्याकडे चला’ या विचाराला शिक्षणाच्या माध्यमातून आधुनिक अर्थ प्राप्त होत असून, ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि क्षमता निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषद शाळा समर्थपणे पुढे येत असल्याचे अधोरेखित झाले आहे.
थोडे नवीन जरा जुने