जि. प. प्राथमिक शाळा कुत्तरडोह येथे ८० वा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा.

विद्यार्थ्यांची कवायत व लेझीम प्रात्यक्षिकांनी वेधले ग्रामस्थांचे लक्ष; विविध उपक्रमांनी परिसर देशभक्तीमय.
कुत्तरडोह (विशेष प्रतिनिधी):

स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुत्तरडोह येथे काल, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिवस अत्यंत उत्साहपूर्ण व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
कारक्रमाच्या अध्यक्षपदी सौ. पूनमताई सहदेव जामकर तर उपाध्यक्षपदी सौ. अनिता केशव नाईक विराजमान होत्या. मुख्य पाहुणे म्हणून गावातील ग्रामपंचायत अधिकारी श्री व्ही. आर. घुगे आणि कृषी अधिकारी म्हात्रे साहेब उपस्थित होते. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे (शा. व्य. स.) इतर सर्व मान्यवर सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि समस्त गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून झाली. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री बालाजी पाचपुते यांनी थोर पुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करून ध्वजारोहण केले.
ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. यानंतर सामूहिक राष्ट्रगीत, ध्वजगीत आणि राज्यगीत सादर करण्यात आले. उपस्थितांनी साक्षरतेची प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यात विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध कवायत संचलन आणि लेझीम प्रात्यक्षिके सादर केली.
कवायत संचलन राजीव बापूराव पाटील सरांनी घेतले, तर विद्याधर श्रीराम सरांनी मुलांमध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवार सरांनी केले.
शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून बालकांना खाऊ वाटप करण्यात आला. सर्व शिक्षकांच्या सहकार्याने हा स्वातंत्र्य दिन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.

थोडे नवीन जरा जुने