वाशीम, दि. १० ऑगस्ट २०२६ :
जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम व जिल्हा तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा रुग्णालय वाशीम यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्रीय शाळा, पोटी; ब्रह्मगिरी विद्यालय, मोहरी; तसेच नरसिंह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, धामणी येथे विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्य व तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमात जिल्हा तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण धाडवे यांनी विद्यार्थ्यांना तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या आरोग्यविषयक दुष्परिणामांची सविस्तर माहिती दिली. लहान वयात तंबाखूचे व्यसन लागण्यामागे मित्रांचा दबाव, कुतूहल, अनुकरण, घरातील किंवा परिसरातील व्यक्तींचे तंबाखू सेवन तसेच तंबाखूजन्य पदार्थांची सहज उपलब्धता हे घटक कारणीभूत ठरू शकतात, असे त्यांनी सांगितले.
लहान मुलांनी आई-वडिलांसाठी किंवा इतर व्यक्तींसाठी दुकानातून तंबाखूजन्य पदार्थ आणून देऊ नयेत. तसेच गोड सुपारीसह कोणत्याही तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळावे. तंबाखूच्या सेवनामुळे मुखाचा कर्करोग तसेच इतर गंभीर आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतः तंबाखूपासून दूर राहण्याबरोबरच कुटुंबातील व्यक्ती व मित्रांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करावेत आणि निरोगी जीवनशैलीच्या चांगल्या सवयी अंगीकाराव्यात, असे आवाहन धाडवे यांनी केले.
यावेळी तंबाखू नियंत्रणासाठी असलेल्या COTPA कायद्याबाबतही विद्यार्थ्यांना प्राथमिक माहिती देण्यात आली.
मनोविकृती सामाजिक कार्यकर्ते सुनील सुर्वे यांनी विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य म्हणजे काय, मानसिक आजार,आजारांची लक्षणे, कारणे व उपचारपद्धती याबाबत मार्गदर्शन केले. मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला व उपचार घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा रुग्णालय वाशीम मार्फत उपलब्ध असलेल्या मानसिक आरोग्य सेवा, औषधोपचार, समुपदेशन, व्यसनमुक्ती कार्यक्रम तसेच दिव्यांग प्रमाणपत्रासंबंधी सेवा याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
तसेच विद्यार्थ्यांना लहान मुलांमध्ये आढळणाऱ्या मानसिक व विकासात्मक समस्या, स्वमग्नता,ADHD,मिरचीचे झटके मतिमंदत्व, अध्ययन क्षमता व अध्ययनातील अडचणी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मानसिक आरोग्याशी संबंधित अडचणी असल्यास त्या लपवू नयेत, तर पालक, शिक्षक किंवा तज्ज्ञ व्यक्तींशी संवाद साधावा, असा संदेश देण्यात आला.
‘टेली-मॅनस’च्या १४४१६ क्रमांकावर समुपदेशनाची सुविधा
मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या, ताण-तणाव किंवा इतर मानसिक अडचणी असल्यास ‘टेली-मॅनस’च्या टोल-फ्री क्रमांक १४४१६ वर संपर्क करून समुपदेशनाची सुविधा घेता येते. या सेवेमध्ये व्यक्तीची माहिती गोपनीय ठेवली जाते, अशी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
कार्यक्रमास पोटी येथील शाळेचे मुख्याध्यापक सुरशे, ब्रह्मगिरी विद्यालयाचे मुख्याध्यापक सोनुणे, नरसिंह माध्य.व उच्च माध्य. विद्यालयाचे मुख्याध्यापक उजवणे, तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“तंबाखूमुक्त विद्यार्थी, सुदृढ मानसिक आरोग्य आणि निरोगी समाज” हा संदेश देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

