प्रधानमंत्री जलस्वराज्य योजनेचे काम बंद असल्याचा आरोप; महिलांना 1 ते 2 किमी दूरून पाणी आणण्याची वेळ.
वाशीम | प्रतिनिधी
वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील तामसाळा गावात गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थ व महिला मंडळाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन देत तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, प्रधानमंत्री जलस्वराज्य योजनेअंतर्गत सुरू असलेली पिण्याच्या पाण्याची योजना बंद पडली आहे. त्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याचे भीषण संकट निर्माण झाले असून महिलांना दररोज 1 ते 2 किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे.
ग्रामस्थांचा आरोप आहे की, वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. पाईपलाईन व जलपुरवठा यंत्रणेत तांत्रिक त्रुटी असून त्या तातडीने दुरुस्त कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. निवेदनावर गावातील महिला व ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या असून त्याची प्रत संबंधित विभागांना देण्यात आली आहे.
