रिसोड | प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्ते कैलास खंदारे यांच्यावर चिखलीहून राहुरीकडे जात असताना झालेल्या कथित हल्ल्याचा लहू गर्जना ग्रुप, मांगुळ झनक (ता. रिसोड, जि. वाशिम) यांनी तीव्र निषेध केला आहे.
ग्रुपने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या हल्ल्यात कैलास खंदारे सुखरूप असून, सामाजिक न्यायासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींवर होणारे असे हल्ले लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचवणारे आहेत. वैचारिक मतभेद हिंसेच्या माध्यमातून व्यक्त करणे चुकीचे असून अशा घटनांचा निषेध करण्यात आला आहे.
निवेदनात प्रशासन व पोलीस विभागाने या प्रकरणाचा सखोल व निष्पक्ष तपास करून हल्लेखोरांसह कटातील सूत्रधारांवरही कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच सामाजिक न्यायासाठीचा लढा लोकशाही मार्गाने सुरू राहील आणि अशा घटनांनी कार्यकर्त्यांचे मनोबल खचणार नाही, असा विश्वास लहू गर्जना ग्रुपने व्यक्त केला आहे.
