Ad Code

एरंडोलच्या मातीचा अभिमान आकाश त्रिवेदी....!


प्रतिनिधी :-एरंडोल
विवेक रा. महाले

कधी कधी एखाद्या छोट्याशा गावातून अशी बातमी येते की संपूर्ण गावाचा, जिल्ह्याचा आणि राज्याचा ऊर अभिमानाने भरून येतो. आज एरंडोलसाठी तसाच एक ऐतिहासिक आणि आनंदाचा क्षण आहे. एरंडोलच्या सुपुत्राने आकाश ओम त्रिवेदी यांनी वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी यूपीएससी परीक्षेत ७३ वा क्रमांक मिळवत आयएएस पद मिळवले आहे. ही केवळ एका व्यक्तीची यशोगाथा नाही, तर एरंडोलच्या मातीचा, संस्कारांचा आणि अथक कष्टांचा विजय आहे.

एरंडोल ही साधी, शांत आणि संस्कारांनी नटलेली नगरी… इथल्या मातीमध्ये स्वप्नं रुजतात, संघर्षातून उभी राहतात आणि एक दिवस आकाशाला गवसणी घालतात. आज त्या मातीचा एक तेजस्वी तारा संपूर्ण देशासमोर चमकला आहे. आकाश त्रिवेदी यशस्वी होऊन फक्त स्वतःचं स्वप्न पूर्ण करत नाही, तर एरंडोलच्या हजारो तरुणांच्या स्वप्नांना नवी दिशा देतो आहे.

कायदेतज्ञ ॲड. ओम त्रिवेदी यांचे सुपुत्र असलेला आकाश लहानपणापासूनच अभ्यासू, शांत, जिद्दी आणि ध्येयवेडा म्हणून ओळखला जात होता. मोठी स्वप्ने पाहण्याची हिंमत आणि ती पूर्ण करण्यासाठीची चिकाटी त्याच्यात होती. यूपीएससी ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे प्रयत्न करतात, अपयश पचवतात आणि पुन्हा उभे राहतात. पण आकाशने पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवून आपली विलक्षण प्रतिभा आणि मेहनतीची ताकद सिद्ध केली.

आज एरंडोलमधील प्रत्येक रस्ता, प्रत्येक शाळा, प्रत्येक शिक्षक आणि प्रत्येक घर या यशाने आनंदित झाले आहे. कारण आकाशचे यश हे फक्त त्याचे नाही; ते संपूर्ण एरंडोलचे यश आहे. छोट्या शहरातूनही मोठी स्वप्ने पाहता येतात आणि ती पूर्णही करता येतात, याचा जिवंत आदर्श आकाशने निर्माण केला आहे.

त्याच्या या यशामागे त्याचे अथक परिश्रम,आई-वडिलांचे उत्तम संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि गावाच्या मातीचे बळ आहे. आज अनेक तरुणांच्या डोळ्यांत नवी स्वप्ने जागी झाली आहेत. प्रत्येक विद्यार्थी मनात विचार करत आहे.“जर एरंडोलचा आकाश करू शकतो, तर आपणही का नाही?”

आज एरंडोल, जळगाव जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र अभिमानाने म्हणत आहे.“हा आमचा आकाश आहे… आणि त्याचे यश आमचेही आहे.”

आकाश त्रिवेदी आणि त्यांच्या कुटुंबियांचे मनःपूर्वक अभिनंदन. भविष्यात देशसेवेतून ते समाजासाठी मोठे कार्य करतील, अनेकांना प्रेरणा देतील आणि एरंडोलचे नाव देशभर अधिक उज्ज्वल करतील, हीच सर्वांची मनापासून शुभेच्छा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या