वाशिम (प्रतिनिधी) – विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ व शासकीय मेडिकल कॉलेज, वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्री रुग्णालय व मेडिकल कॉलेज, वाशिम परिसरात दिनांक ६, ७ व ८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान भव्य ‘कुतूहल विज्ञान प्रदर्शनी’ आयोजित करण्यात आली होती. या त्रिदिवसीय प्रदर्शनीला वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थी, शिक्षक तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त व उत्कृष्ट प्रतिसाद लाभला.
या प्रदर्शनीला विशेषतः रामा इंटरनॅशनल स्कूल, वाशिम येथील विद्यार्थी व शिक्षकांनी भेट देत सक्रिय सहभाग नोंदवला. तसेच इतर विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
प्रदर्शनीमध्ये विज्ञानासोबतच आरोग्यविषयक माहिती प्रात्यक्षिक स्वरूपात सादर करण्यात आली. मानवी शरीरातील विविध अवयवांची कार्यप्रणाली सजीव मॉडेल्सद्वारे स्पष्ट करण्यात आली. याशिवाय शरीराशी संबंधित काही प्रचलित समजुती व मिथकांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून उलगडा करण्यात आला.
विशेषतः सीपीआर (CPR) कसा द्यावा, अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीत प्राथमिक उपचार कसे करावेत, तसेच विविध आजारांवरील प्रथमोपचार याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. त्यामुळे उपस्थितांना अत्यंत उपयुक्त व जीवनरक्षक माहिती मिळाली.
प्रदर्शनीत आयुर्वेद, आयुष, युनानी, होमिओपॅथी आदी वैद्यकीय पद्धतींबाबत स्वतंत्र स्टॉल्स उभारण्यात आले होते. वाशिम जिल्ह्यातील सर्व नर्सिंग कॉलेज तसेच विज्ञान महाविद्यालयांनी उत्साहाने सहभाग घेतला. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली.
दिनांक ८ फेब्रुवारी रोजी समारोप समारंभ संपन्न झाला. यावेळी माननीय जिल्हाधिकारी मा. श्री. योगेश कुंभेजकर (भा.प्र.से.) यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी व सक्रीय सहभागासाठी शाळा-महाविद्यालयांचे शिक्षक, विद्यार्थी तसेच कर्मचाऱ्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाला मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता (डीन), विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन बळकट होण्यास मदत होते व आरोग्य जनजागृतीस चालना मिळते, असे मत व्यक्त केले.
या त्रिदिवसीय ‘कुतूहल’ विज्ञान प्रदर्शनीमुळे वाशिम जिल्ह्यात विज्ञान व आरोग्य जनजागृतीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Facebook
0 Comments