वाशिम :सिकलसेल अरुणोदय विशेष अभियानांतर्गत वरिष्ठ अधिकाऱ्यांची वाशिम जिल्ह्यात भेट, कामकाजाचा आढावा घेण्यात आला. राज्य शासनामार्फत १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणाऱ्या सिकलसेल अरुणोदय विशेष अभियानाच्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जिल्हास्तरावर सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी भेटी देण्यात येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा मंडळ पुणे डॉ. संदीप सांगळे, उपसंचालक अकोला मंडळ डॉ. सुशील कुमार वाकचौरे तसेच सहाय्यक संचालक आरोग्य सेवा पुणे डॉ. अविनाश आहेर यांनी वाशिम जिल्ह्यातील काटा प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन अभियानाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी ० ते ४० वयोगटातील नागरिकांची तपासणी करणे, निदान झालेल्या रुग्णांवर योग्य उपचार करणे, समुपदेशन करणे तसेच जनजागृती वाढविणे याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले. सिकलसेल विशेष अभियान शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या इतर विविध कार्यक्रमांचाही आढावा घेण्यात आला.
यावेळी जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. महेशचंद्र चाफे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रामहरी बेले, सिकलसेल कार्यक्रम समन्वयक पुरुषोत्तम इंगोले तसेच इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

Facebook
0 Comments