Top News

उमलत्या कळ्यांना तंबाखू मुक्तीचे धडे,वाशीम आरोग्य विभागाचा अनोखा उपक्रम.

 

मालेगाव (प्रतिनिधी):

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा रुग्णालय वाशिम आणि ग्रामीण रुग्णालय मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, मारसुळ ता.मालेगाव येथे 'तंबाखू मुक्तीचा जागर' हा जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात पार पडला. या वेळी शालेय विद्यार्थ्यांना तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम आणि निरोगी जीवनशैलीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
​हा कार्यक्रम वाशिमचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अविनाश पुरी आणि बाह्य संपर्क वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.
​कार्यक्रमा दरम्यान सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण धाडवे यांनी विद्यार्थ्यांना तंबाखू, गुटखा, बिडी व सिगारेट यांसारख्या व्यसनांमुळे आरोग्यावर होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांची सविस्तर माहिती दिली. मुख कर्करोग, त्याची प्राथमिक लक्षणे, त्यावरील उपाययोजना, तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा (कोटपा २००३) आणि तंबाखू मुक्त शाळा या संकल्पनेवर त्यांनी प्रकाश टाकला. तसेच व्यसनमुक्तीसाठी केंद्र सरकारच्या मोफत टोल-फ्री क्रमांक १८००-११-२३५६ चा वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
​ग्रामीण रुग्णालय मालेगाव येथील समुपदेशक प्रवीण गोरे यांनी असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. तर जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत मनोविकृती सामाजिक कार्यकर्ते सुनील सुर्वे यांनी सकारात्मक जीवनशैली, मानसिक स्वास्थ्य आणि निकोप विचारसरणी कशी जोपासावी, याविषयी मार्गदर्शन केले.
​कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी तंबाखू मुक्तीची सामूहिक शपथ घेऊन तंबाखू मुक्त व निरोगी आयुष्याचा दृढ संकल्प केला.
​या जनजागृतीपर उपक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री. उगले सर, सहाय्यक शिक्षक श्री. तायडे सर, इतर शिक्षकवृंद तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी मोलाचे सहकार्य केले.
थोडे नवीन जरा जुने