जंतर-मंतरवर सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली; आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष?

सोनम वांगचुक यांचा जीव गेल्यावर सरकार मागण्या पूर्ण करेल का?अशा प्रकारच्या प्रतिक्रिया समाजमाध्यमातून येत आहेत.

UBN News Network.

देशातील परीक्षा गैरव्यवहार, पेपरफुटी, बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचाराविरोधात कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू केलेल्या आंदोलनाला प्रसिद्ध पर्यावरणवादी व शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी पाठिंबा देत २८ जून २०२६ पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. CJP ने २० जून २०२६ रोजी आंदोलनाची सुरुवात केली होती, तर २४ जूनपासून आंदोलनकर्त्यांनी उपोषण सुरू केले होते.
आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) बरखास्त करणे, NEETसह विविध परीक्षांतील पेपरफुटी आणि गैरव्यवहारांची निष्पक्ष चौकशी करणे, तसेच विद्यार्थ्यांना न्याय आणि नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.
सलग अनेक दिवसांच्या उपोषणामुळे सोनम वांगचुक यांची प्रकृती चिंताजनक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचे सुमारे ८.५ किलो वजन घटल्याचे सांगितले जात असून, रक्तातील साखरेची पातळीही धोकादायकरीत्या कमी झाल्याची माहिती आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत देशभरातून चिंता व्यक्त केली जात असून, विविध सामाजिक संस्था, विद्यार्थी संघटना, कलाकार आणि राजकीय नेत्यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.
सोशल मीडियावर सरकारवर टीका
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी सरकारने आंदोलनाची तातडीने दखल घेऊन संवाद साधावा आणि मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.
काही सोशल मीडिया पोस्टमध्ये, "या देशात जिवंत व्यक्तीच्या कार्याची कदर केली जात नाही; तो गेल्यानंतरच त्याला महान ठरवले जाते," अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे. तसेच "शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा झाला तर दुसरा मंत्री मिळू शकतो; मात्र सोनम वांगचुक यांच्यासारखा समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि देशासाठी झटणारा व्यक्ती गमावला तर ते भारताचे मोठे नुकसान ठरेल," असे मतही अनेकांनी व्यक्त केले आहे.
सरकारने तातडीने सोनम वांगचुक आणि आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढावा, तसेच त्यांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत आहे.
थोडे नवीन जरा जुने