रिसोड-मालेगावातील शेतकऱ्यांना जानेवारीपर्यंत सिंचनासाठी पाणी द्या.
प्रतिनिधी स्वाती गायकवाड
मालेगाव, दि. २९ ऑक्टोबर : रिसोड व मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना आणि फळबागांना सिंचनासाठी जानेवारी महिन्यापर्यंत धरणांमधून पाणी उपलब्ध करून द्यावे, तसेच बंद करण्यात आलेल्या वीजजोडण्या तातडीने पूर्ववत कराव्यात, अशी मागणी आमदार अमित सुभाषराव झनक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी २७ ऑक्टोबर रोजी वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांना शिफारसपत्र सादर केले.
पावसाअभावी शेतातील पिके आणि फळबागांना पाण्याची नितांत गरज असताना सिंचनासाठी होणारा वीजपुरवठा बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. विशेषतः हळद, तूर या पिकांसह संत्रा फळबागांना पाण्याची आवश्यकता असून, पाण्याअभावी पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रिसोड व मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने आमदार झनक यांनी हा प्रश्न प्रशासनाकडे मांडला. बंद वीजजोडण्या पुन्हा सुरू करून धरणांमधील पाणी जानेवारी महिन्यापर्यंत शेतीसाठी उपलब्ध करून द्यावे, अशी शिफारस त्यांनी केली आहे. यामुळे पिके व फळबागांना आवश्यक पाणी मिळून शेतकऱ्यांचे संभाव्य आर्थिक नुकसान टाळता येईल, अशी अपेक्षा आहे.
या मागणीसंदर्भातील पत्राच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
आता आमदार झनक यांच्या मागणीवर जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभाग कोणता निर्णय घेतात, याकडे रिसोड व मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा