जुन्या भांडणाची कुरापत काढून १८ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या.

 पळासखेडे बुद्रुक शिवारातील थरारक घटना; आरोपीकडून प्रत्यक्षदर्शींना धमकी देत पलायन.

 प्रतिनिधी -विवेक आर महाले 
एरंडोल 
मागील किरकोळ भांडणाची कुरापत काढून एका १८ वर्षीय तरुणाच्या पोटात धारदार चाकू भोसकून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना १० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पारोळा तालुक्यातील पळासखेडे बुद्रुक शिवारात रवींद्र पाटील यांच्या शेताजवळ घडली. ऐन तारुण्यात उगवत्या विद्यार्थ्याचा अशा क्रूर पद्धतीने बळी गेल्याने संपूर्ण पारोळा तालुक्यात संताप व हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेत मयूर दुर्वास पाटील (वय १८, रा. पळासखेडे बुद्रुक, ता. पारोळा) या तरुणाचा मृत्यू झाला. मयूर हा पारोळा येथील किसान कॉलेजमध्ये प्रथम वर्ष कला शाखेत शिक्षण घेत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, १० सप्टेंबर रोजी दुपारी मयूर हा त्याचा मावस चुलत भाऊ संदीप पाटील याच्यासोबत शेताकडून घराकडे परतत होता. याचवेळी संशयित आरोपी अंकुश नेहरू पाटील याने त्यांना रस्त्यात अडवून जुन्या वादाची कुरापत काढत वाद घालण्यास सुरुवात केली.
वाद वाढत असल्याचे पाहून मयूरचे वडील बाळू ऊर्फ दुर्वास पाटील तसेच गावातील ग्रामस्थ राजेंद्र ज्ञानेश्वर पाटील व विकास बापू पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अंकुशला समजावून सांगत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त झालेल्या अंकुशने कोणाचेही न ऐकता पॅन्टच्या डाव्या खिशातून धारदार चाकू काढून मयूरच्या पोटावर वार केले.
चाकूचा खोलवर वार झाल्याने मयूर रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर आरोपीने उपस्थित प्रत्यक्षदर्शींना धमकावत घटनास्थळावरून पलायन केले.
गंभीर जखमी मयूरला उपस्थितांनी तातडीने दुचाकीवरून पारोळा येथील कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना
या प्रकरणी मयूरचे वडील बाळू ऊर्फ दुर्वास भिका पाटील यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर संशयित आरोपी अंकुश नेहरू पाटील फरार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
थोडे नवीन जरा जुने