प्रतिनिधी: स्वाती गायकवाड
वाशिम : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने विशेष निवडणूक समिती गठीत केली आहे. या समितीत रिसोड-मालेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित सुभाषराव झनक यांचा समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांनी २५ सप्टेंबर २०२६ रोजी कार्यालयीन आदेशाद्वारे समितीची घोषणा केली. समितीत माजी मंत्री यशोमती ठाकूर, शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके यांच्यासह आमदार अमित झनक, आमदार साजिद खान पठाण, आमदार अनिल मांगुळकर आणि आमदार धीरज लिंगाडे यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. उपलब्ध वृत्तानुसार समितीत एकूण ११ सदस्य आहेत.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी संघटनात्मक नियोजन, शिक्षक मतदारांशी संपर्क तसेच निवडणुकीशी संबंधित पक्षाच्या कामकाजासाठी या समितीची भूमिका राहणार आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची २०२६ ची निवडणूक प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली असून, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार असल्याची निवडणूक सूचना प्रसिद्ध झाली आहे.
आमदार अमित झनक यांचा समितीत समावेश झाल्याने वाशिम जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये या नियुक्तीची चर्चा सुरू झाली आहे. रिसोड-मालेगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आ. झनक यांच्यावर अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाने जबाबदारी सोपविली आहे.

टिप्पणी पोस्ट करा