Top News

२९ सप्टेंबरच्या मुंबई महामोर्चासाठी वाशिममधून सकल मातंग समाजाला एकजुटीचे आवाहन.-कैलासदादा खंदारे

प्रतिनिधी स्वाती गायकवाड 

वाशिम : महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षणाचे उपवर्गीकरण तातडीने लागू करावे, या मागणीसाठी २९ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे ‘उपवर्गीकरण निर्धार महामोर्चा’ आयोजित करण्यात आला आहे. या महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (१९ सप्टेंबर) वाशिम जिल्ह्यातून सकल मातंग समाजाला मुंबईकडे मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलासदादा खंदारे यांनी समाजबांधवांना संबोधित करताना भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी, न्याय्य हक्कासाठी आणि आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी समाजाने एकजुटीने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
महामोर्चाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, सकल मातंग समाज, महाराष्ट्र तसेच संघर्षशील कार्यकर्ते, नेते आणि वंचित जाती-जमातींच्या बांधवांच्या सहभागातून या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. “जय लहुजी बोलो, मंत्रालय चलो” असा संदेश देत २९ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी होणाऱ्या या महामोर्चाच्या माध्यमातून समाजाची एकजूट आणि मागणी शासनापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
“भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी, न्याय्य हक्कासाठी आणि आपल्या मागणीच्या निर्णायक लढ्यासाठी सकल मातंग समाजाने एकजुटीने मुंबईकडे कूच करूया,” असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने