मालेगाव प्रतिनिधी : सुखदेव तायडे
मालेगाव तालुक्यात आदिवासी दिनानिमित्त विविध ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम व भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. आदिवासी समाजाच्या हक्क, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकतेचा संदेश देत ही रॅली उत्साहात पार पडली.
रॅलीची सुरुवात जऊळका येथून झाली. त्यानंतर रॅलीने आवरदरी, वडी, धमधमी, अमाना, मुसळवाडी, माळेगाव, धरमवाडी, कुतरडोह, रामराववाडी, पिंपळसेंडा आदी गावांमधून मार्गक्रमण केले. ठिकठिकाणी नागरिकांनी रॅलीचे स्वागत केले. पारंपरिक वेशभूषा, घोषणाबाजी आणि आदिवासी संस्कृतीचे दर्शन यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या कार्यक्रमाला साखरे सर (किन्हीराजा), माजी पंचायत समिती सदस्य माळेगाव, सीताबाई धंदारे (धरमवाडी), विनोद नाईक (बिरसा मुंडा अध्यक्ष, कुत्तारडोह), सुखदेव तायडे (न्यायालय मालेगाव, विधी सेवा प्राधिकरण वाशिम), सहदेव जामकर, आनंदा भोकरे, जीवन झ्याटे (कवरदरी) यांच्यासह विविध मान्यवर व आदिवासी समाजबांधव उपस्थित होते.
रॅलीचा समारोप किन्हीराजा येथे करण्यात आला. यावेळी आदिवासी समाजाच्या विकासासाठी शिक्षण, सामाजिक एकता, कायदेविषयक जनजागृती आणि आपल्या संस्कृतीचे जतन करण्याचे आवाहन करण्यात आले.
आदिवासी दिनाच्या निमित्ताने आयोजित या रॅलीमुळे मालेगाव तालुक्यातील आदिवासी समाजाची एकजूट आणि सांस्कृतिक अस्मिता अधोरेखित झाली.
