कुकसा फाट्यावर एसटी बस थांब्याला हिरवा कंदील; सर्व फेऱ्यांना थांबा मंजूर

        

प्रतिनिधी: स्वाती गायकवाड

अकोला, दि. १९ : कुकसा फाट्यावर एसटी बस थांबत नसल्याने गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाशांना होत असलेली गैरसोय आणि अतिरिक्त आर्थिक भुर्दंड आता दूर होणार आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख महादेवराव नारायणराव ठाकरे यांनी केलेल्या मागणीला अखेर यश आले असून, राज्य परिवहन विभागाने कुकसा मार्गावरील सर्व एसटी फेऱ्यांना कुकसा फाट्यावर अधिकृत थांबा मंजूर केला आहे.
कुकसा फाट्यावर परिसरातील सुमारे १५ गावांतील नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. मात्र, एसटी बस थांबत नसल्यामुळे प्रवाशांना केनवड अथवा डोणगाव येथे जाऊन बस पकडावी लागत होती. त्यामुळे वेळ आणि प्रवासाचा अतिरिक्त खर्च वाढत होता. विशेषतः विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच उपचारासाठी अकोला, वाशिम, छत्रपती संभाजीनगर आदी शहरांकडे जाणाऱ्या रुग्णांची मोठी गैरसोय होत होती.
या बस थांब्याचा सर्वाधिक फायदा केनवड येथील हायस्कूलमध्ये शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. कुकसा फाट्यावर बस थांबणार असल्याने परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बस पकडणे सोपे होणार असून, त्यांचा वेळ, श्रम आणि प्रवासाचा अतिरिक्त खर्च वाचणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय शैक्षणिकदृष्ट्याही महत्त्वाचा ठरणार आहे.
ही बाब लक्षात घेऊन महादेवराव ठाकरे यांनी कुकसा फाट्यावर एसटी बस थांबा देण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीपत्राची दखल घेत हा प्रस्ताव मध्यवर्ती कार्यालयाकडे पाठविण्यात आला. त्यानंतर राज्य परिवहन अकोला विभागाच्या विभाग नियंत्रकांनी कुकसा मार्गावरील सर्व एसटी फेऱ्यांना कुकसा फाट्यावर थांबा मंजूर केला आहे.
तसेच संबंधित चालक व वाहकांना कुकसा फाट्यावर बस थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, प्रवाशांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे कुकसा फाटा परिसरातील सुमारे १५ गावांतील नागरिकांसह केनवड हायस्कूलमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली मागणी मार्गी लागल्याने परिसरातून समाधान व्यक्त होत असून, महादेवराव ठाकरे यांच्या पाठपुराव्याचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
थोडे नवीन जरा जुने