"किशोर मनाला सकारात्मक दिशा; तंबाखू नियंत्रण व मानसिक आरोग्यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन".


मंगरुळपीर प्रतिनिधी :
दिनांक 28 जुलै २०२६ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय, गोगरी (ता. मंगरूळपीर) येथे विद्यार्थ्यांसाठी ‘तंबाखू नियंत्रण, किशोर स्वास्थ्य व मानसिक आरोग्य’ या विषयावर विशेष जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
​हा कार्यक्रम जिल्हा रुग्णालय वाशिम अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अविनाश पुरी आणि बाह्य संपर्क वैद्यकीय अधिकारी डॉ. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. नाचणे सर उपस्थित होते.
​ जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे चे सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण धाडवे यांनी विद्यार्थ्यांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने शरीरावर होणाऱ्या घातक दुष्परिणामांबद्दल सविस्तर माहिती दिली.
​"मित्रपरिवाराच्या दबावाला बळी पडून अनेकदा शाळकरी मुले व्यसनाच्या आहारी जातात.तंबाखूमुळे मुखाचा कर्करोग (ओरल कॅन्सर), हृदयविकार आणि फुफ्फुसाचे गंभीर आजार होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा घातक पदार्थांना ठाम नकार देऊन तंबाखूमुक्त जीवनाचा संकल्प करावा व आपल्या कुटुंबात आणि समाजातही याविषयी जागृती करावी," असे आवाहन त्यांनी केले.
​मनोविकृती सामाजिक कार्यकर्ते सुनील सुर्वे यांनी शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्याचे महत्त्व स्पष्ट केले. आजच्या काळात भेडसावणारा ताणतणाव, चिंता आणि मानसिक दबाव यावर मात कशी करावी, याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
​ किशोर स्वास्थ्य कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक दीपक भालेराव यांनी किशोरवयात मुलांमध्ये होणारे शारीरिक व भावनिक बदल आणि त्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या समस्यांवर सखोल माहिती देत मोलाचा सल्ला दिला.
​कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
थोडे नवीन जरा जुने