मांगूळ झनक येथे विजांच्या कडकडाटासह वज्राघात; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी.

रिसोड :प्रतिनिधी 
रिसोड तालुक्यातील मौजे मांगूळ झनक येथे आज, सोमवार दिनांक २७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी पाऊस सुरू असताना शेतात काम करणाऱ्या मजुरांवर वीज कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या भीषण वज्राघातात एका ३७ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. गजानन शेषराव सुरुशे (वय ३७) असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूमुळे एका गरीब कुटुंबाचा आधार हिरावला गेला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मांगूळ झनक परिसरातील विठ्ठल कोरडे यांच्या शेतात टोचन यंत्राद्वारे सोयाबीनची लागवड सुरू होती. दरम्यान, सायंकाळी अंदाजे ५ ते ६ च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे शेतात काम करणारे मजूर स्वतःचा बचाव करण्यासाठी शेतातीलच एका गोंधणीच्या झाडाखाली जाऊन बसले. याच वेळी अचानक काळजाचा थरकाप उडवणारी वीज थेट त्या झाडावरच कोसळली.या दुर्घटनेत झाडाखाली बसलेले गजानन सुरुशे यांचा जागीच मृत्यू झाला. मृत गजानन यांच्या पश्चात वृद्ध आई आणि १० व ६ वर्षांच्या दोन अत्यंत लहान चिमुरड्या मुली असा परिवार आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष अचानक गेल्याने सुरुशे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या वज्राघातात त्यांच्यासोबत झाडाखाली बसलेले विशाल नंदकिशोर लेमडे (वय ३०) व रवी रणजित कोरडे (वय ३०) हे दोघे जण वीज लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत. विजेच्या तीव्र धक्क्यामुळे (आच लागल्याने) या दोन्ही युवकांच्या पायांची हालचाल पूर्णपणे बंद झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.घटनेची माहिती मिळताच स्थानिक शेतकरी बांधवांनी व नागरिकांनी तातडीने शेताकडे धाव घेतली. जखमींना पुढील तातडीच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हृदयद्रावक आणि अत्यंत भीषण दुर्घटनेमुळे मांगूळ झनक गावासह तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त होत असून, सर्वत्र शोककळा पसरली आहे.
थोडे नवीन जरा जुने