वाशिम, प्रतिनिधी :
श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय, वाशिमच्या संचालक मंडळाशी संबंधित कोठारी परिवारातील चि. आदित्य कोठारी यांनी प्रतिष्ठित चार्टर्ड अकाउंटंट (C.A.) परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण करून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या गौरवास्पद यशानिमित्त महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या राहत्या घरी भेट देऊन आदित्य कोठारी यांचा तसेच संपूर्ण कोठारी परिवाराचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
या प्रसंगी आदित्य यांचे वडील आशिषभाऊ कोठारी, जुगलभाऊ कोठारी, महाविद्यालयाचे अध्यक्ष मनोजभाऊ कोठारी तसेच राहुलभाऊ कोठारी यांच्यासह संपूर्ण कोठारी परिवार उपस्थित होता. उपस्थितांनी आदित्य यांच्या यशाबद्दल अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सत्कार समारंभाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुलकुमार राऊत, डॉ. संदीप शिंदे, डॉ. देवानंद अंभोरे, डॉ. अशोक वाघ, प्रा. ज्ञानेश्वर गोरे, प्रा. उद्धव जमधाडे यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना आदित्य कोठारी यांनी आपल्या यशाचे श्रेय कुटुंबीयांनी दिलेले शैक्षणिक संस्कार, सातत्यपूर्ण अभ्यास आणि वेळेच्या योग्य नियोजनाला दिले. “प्रथम प्रयत्नात यश मिळविण्यामागे कुटुंबीयांचे मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि सकारात्मक वातावरण हेच महत्त्वाचे कारण आहे,” असे त्यांनी सांगितले.
तसेच महाविद्यालयाचे अध्यक्ष मनोजभाऊ कोठारी आणि संपूर्ण परिवाराच्या प्रेरणा व पाठबळामुळे हे यश संपादन करता आले, असेही त्यांनी नमूद केले.
आदित्य कोठारी यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल वाशिम शहरासह संपूर्ण जिल्ह्यात त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
