Ad Code

"सिकलसेल-थॅलेसिमिया रुग्णांसाठी जीवनदायी उपक्रम"

८ मे जागतिक थॅलेसिमिया दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय वाशीम येथे रक्तदान शिबिर.

वाशिम, दि. 8 मे : सिकलसेल व थॅलेसिमिया या आजारांनी ग्रस्त रुग्णांना नियमित रक्तपुरवठा अत्यंत आवश्यक असतो. याच सामाजिक जाणीवेने आणि जागतिक थॅलेसिमिया दिनाचे औचित्य साधून जिल्हा रुग्णालय वाशीम येथे सिकलसेल कार्यक्रमांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी अतिजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी स्वप्नील चव्हाण, रक्तपेढी तज्ञ डॉ. हरिदास मुंडे, समन्वयक श्री इंगोले, तसेच राज पवार, जनसंपर्क अधिकारी सचिन दंडे,श्री. फुके व इतर कर्मचारी उपस्थित होते.
रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली. यामध्ये पुरुषोत्तम इंगोले, धनंजय जाधव, स्वप्नील चव्हाण,जगदीश पवार, डॉ. स्वप्नील तापडिया, डॉ. दशरथ वाकूडकर, गोपाल मसुडकर, ज्ञानेश्वर कोगदे, राम सरकटे, राम धाडवे, अनुप चोळे, राज पवार, प्रशांत गोटे, दत्ता गोटे, प्रदीप पट्टेबहादूर, वाघमारे, सावंत तसेच इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.
थॅलेसिमिया हा एक आनुवंशिक (जन्मजात) रक्तविकार आहे. या आजारात शरीरात हिमोग्लोबिन योग्य प्रमाणात तयार होत नाही, त्यामुळे रुग्णाला वारंवार रक्ताची गरज भासते. थॅलेसिमिया मुख्यतः दोन प्रकारचा असतो – मेजर (गंभीर) आणि मायनर (सौम्य). थॅलेसिमिया मेजर असलेल्या रुग्णांना आयुष्यभर नियमित रक्तदानावर अवलंबून राहावे लागते. हा आजार आई-वडिलांकडून मुलांमध्ये येऊ शकतो, त्यामुळे विवाहपूर्व तपासणी आणि जनजागृती अत्यंत महत्त्वाची आहे.
यावेळी मा. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून प्रत्येकाने पुढाकार घेऊन रक्तदान करावे, जेणेकरून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होईल.” या उपक्रमामुळे सिकलसेल व थॅलेसिमिया रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून समाजात रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण होईल असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदिप पट्टेबहादूर यांनी केले. तर प्रास्ताविक सिकलसेल जिल्हा समन्वयक पुरुषउत्तम इंगोले यांनी केले सर्वांचे आभार समुपदेशक राजकुमार पवार यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या