सावध राहा! यशाचा 'शॉर्टकट' पडू शकतो महागात...
वाशिम : सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एका सुशिक्षित बेरोजगार युवकाची तब्बल १ लाख ७३ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या अट्टल भामट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रमेश रामकृष्ण नवघरे (वय ४७, रा. पार्डी आसरा, जि. वाशिम) असे आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भगवान चांगदेव वानखेडे यांनी वाशिम शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आरोपीने फिर्यादीच्या मुलाला वाशिम पंचायत समिती येथे पीटीओ (Panel Technical Officer) पदावर सरकारी नोकरी लावून देण्याचे खोटे आश्वासन दिले होते. त्यासाठी आरोपीने वेळोवेळी फिर्यादीकडून एकूण १ लाख ७३ हजार रुपये उकळल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी आरोपीने पंचायत समितीचे बनावट नियुक्तीपत्र तयार करून फिर्यादीला दिल्याचेही तपासात समोर आले आहे. नियुक्तीपत्र बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली.
त्यानुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४), ३३६(३), ३४०, ३४०(२), ३४१(१)(२), ३३९ आणि ३३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, स.पो.नि. जगदीश बांगर, पो.उप.नि. नीलेश जाधव व त्यांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान आरोपी वाशिम शहरातच असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने सापळा रचून वाशिम येथील ‘पवन हॉटेल’मधून आरोपीला ताब्यात घेतले.
■ पोलिस अधीक्षकांचे आवाहन
नोकरी संदर्भातील कोणतीही माहिती अथवा जाहिरात केवळ संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊनच तपासून घ्यावी. नोकरीच्या नावाखाली कुणीही पैशांची मागणी केल्यास तत्काळ सावध व्हावे. कोणताही आर्थिक व्यवहार करू नये तसेच त्वरित जवळच्या पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

0 टिप्पण्या