Ad Code

जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, मजुरांच्या गाडीला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू

UBN न्यूज नेटवर्क 

Jalna Road Accident: जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, मजुरांच्या गाडीला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मदतीची घोषणा करण्यात आली आहे. जालन्यात समृद्धी महामार्गावर बुधवारी झालेल्या भीषण अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. प्राथमिक माहितीनुसार, समृद्धी महामार्गावरील (samruddhi mahamarg) कडवंची गावाजवळ हा अपघात (Accident) झाला. कडवंची गावाकडून जालना शहराकडे येणाऱ्या मजुरांच्या पिक अपला मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत आठ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सहा महिलांचा समावेश आहे. या महिला समृद्धी महामार्गावर सफाईचे काम करत होत्या. काम आटोपून या महिला पिकअप व्हॅनमध्ये बसल्या होत्या. त्यावेळी मुंबईच्या दिशेने निघालेल्या भरधाव ट्रकने पिकअप व्हॅनला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, आठ महिलांनी जागेवरच प्राण सोडला. 

हा अपघात झाल्यानंतर मदतीसाठी पोलीस घटनास्थळी उशीरा पोहोचले, असा आरोप होत आहे. यामुळे स्थानिक नागरिक संतापले होते. या अपघाताचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. दोन जण गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. मात्र, यानिमित्ताने समृद्धी महामार्गावरील अपघातांचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या अपघातानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन मदतीची घोषणा केली आहे. जालनानजीक समृद्धी महामार्गावर झालेल्या एका अपघातात 8 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे लोक जखमी झाले त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक स्वतः तेथे आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मृत आणि जखमींमध्ये महिला कामगारांचा समावेशसमृद्धी महामार्ग अपघात जखमींची नावे:प्रयागबाई बाबासाहेब वाघ (वय ३०),कविता विठ्ठल चौधरी (वय ३५),दिनेश रंगनाथ गायकवाड (वय ४२),एक अनोळखी (वय ५०) ही जखमीची नावे असून त्यांच्यावर जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

समृद्धी महामार्ग अपघातील मृतांची नावे: अलकाबाई दादाराव आदमाने (वय ४५, रा. निधोना), लक्ष्मीबाई संतोष मदन (वय ३५, केळीगव्हाण), मीना परमेश्वर आदमाने (वय ४५, रा. निधोना), कांचनबाई प्रकाश आदमाने (वय ५०, रा. निधोना), ताराबाई गहेणाजी चौधरी (वय ६०, रा. केळीगव्हाण), कडूबाई रामदास मदन (वय ५५, रा. केळीगव्हाण), सुमनबाई कचरू आदमाने (वय ७०, रा. निधोना)

महिनाभरात दुसरी मोठी दुर्घटना; प्रशासन सुस्त?विशेष म्हणजे, महिनाभरापूर्वी ६ मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाडजवळ अशाच एका भीषण अपघातात तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. तेव्हा रस्ता दुरुस्तीचे काम करून जेवण करत बसलेल्या कामगारांना एका ट्रकने चिरडले होते. एकाच महिन्याच्या अंतराने कामगारांचा बळी घेणारा हा दुसरा मोठा अपघात असल्याने, समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेबाबत आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 समृद्धीवर वारंवार अपघाताने चिंता अपघातामुळे महामार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे समृद्धी महामार्गावरील 'ओव्हरस्पीड' आणि कामगारांच्या सुरक्षेसाठी असलेल्या नियमावलीच्या अंमलबजावणीवर नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या