रिसोड प्रतिनिधी :
रिसोड तालुक्यातील धोडप उगले येथील ऋषिकेश शिवशंकर खोडके यांनी गावातील पहिले बी.पी.एम. (ब्रांच पोस्ट मॅनेजर) होण्याचा मान मिळवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गावकऱ्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.
ऋषिकेश हे बी.एससी. शिक्षित असून त्यांच्या वडिलांचा व्यवसाय शेती आहे. विशेष म्हणजे, डावा हात अपंग असतानाही त्यांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.
ब्रांच पोस्ट मॅनेजर भरतीसाठीचा त्यांचा दोन वर्षांचा प्रवास अत्यंत खडतर होता. अनेक अडथळे, अडचणी आणि शारीरिक मर्यादा असूनही त्यांनी हार न मानता अथक परिश्रम केले आणि यश मिळवले, असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
या यशाच्या प्रवासात संचालक श्री. गोपाल मानिकराव वांडे तसेच गायकवाड क्लासेसचे संचालक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या योग्य दिशादर्शनामुळेच यशाचा मार्ग सुकर झाला, असे त्यांनी नमूद केले.
त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, मोठे भाऊ अक्षय शिवशंकर खोडके (इंडियन आर्मी) व गुरुजनांना दिले. त्यांच्या सततच्या पाठिंब्यामुळेच हे स्वप्न साकार झाले, असे त्यांनी सांगितले.
"ही नोकरी नसून माझ्या संघर्षाचे सुवर्ण फळ आहे," असे भावनिक उद्गारही त्यांनी व्यक्त केले.
यावेळी त्यांनी देशाची प्रामाणिकपणे सेवा करण्याची शपथ घेतली. तसेच समाजातील युवक-युवतींनी, विशेषतः दिव्यांग बांधवांनी, त्यांच्या आदर्शातून प्रेरणा घेऊन शिक्षण व करिअरकडे वाटचाल करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

0 टिप्पण्या