Ticker

6/recent/ticker-posts 🔥 Breaking News | 🔔 Subscribe Awaj TV10 Marathi

Ad Code

विद्यार्थ्यांनी निर्धास्तपणे परीक्षा द्यावी – गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने यांचे आवाहन.

कारंजा (प्रतिनिधी) – फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या बारावीच्या सार्वजनिक परीक्षेसाठी कारंजा तालुक्यातील शिक्षण विभागाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर सर्व केंद्रांवर योग्य नियोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी कोणताही ताण न घेता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने यांनी केले आहे.
परीक्षा केंद्रांवर केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक तसेच कर्मचाऱ्यांना सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. प्रश्नपत्रिकांची सुरक्षित वाहतूक, उत्तरपत्रिकांचे संकलन आणि साठवणूक याबाबत विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. गैरप्रकार टाळण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
यंदा तालुक्यात एकूण २,४०३ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसणार आहेत. जि. प. हायस्कूल कामरगाव, विद्या भारती ज्युनिअर कॉलेज कारंजा, महात्मा गांधी विद्यालय लोहगाव, जि. प. हायस्कूल उंबर्डा आणि पिंप्री फॉरेस्ट येथील केंद्रांवर परीक्षा होणार आहे. लोहगाव येथील महात्मा गांधी विद्यालयात सर्वाधिक विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे.
२० फेब्रुवारीपासून परीक्षेला सुरुवात होणार असून इंग्रजी विषयाच्या पेपरने प्रारंभ होईल. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी हजर राहून प्रवेशपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत, असेही सूचित करण्यात आले आहे.

१९ मार्च रोजी अंतिम पेपर पार पडणार असून संपूर्ण परीक्षा प्रक्रिया शांत, सुव्यवस्थित आणि पारदर्शक वातावरणात पूर्ण होईल, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments