सहजपूर . परभणी – शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन संपादन प्रक्रियेला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर प्रशासनाने मध्यरात्री कारवाई केल्याची घटना तालुक्यातील सहजपूर येथे घडली. या कारवाईमुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून काही काळ संचारबंदीसदृश स्थिती होती.
प्रशासनाकडून शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पासाठी नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र अनेक शेतकऱ्यांनी नोटिसा स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह अधिकाऱ्यांनी गावात प्रवेश करून कलम १४४ अंतर्गत निर्बंध लागू करत जमीन मोजणी सुरू केली.
जमीन मोजणीला विरोध करताना काही शेतकरी व महिलांनी “आम्हाला आधी गोळ्या घाला आणि मग जमीन मोजा” असा आक्रोश व्यक्त केला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काहींना ताब्यात घेतल्याचे समजते. ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यांना तालुक्यातील विविध पोलीस ठाण्यात हलविण्यात आले.
या घटनेनंतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. घोषणाबाजी व रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. प्रशासनाच्या दडपशाहीचा आरोप करत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.
दरम्यान, प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलल्याचे सांगितले आहे. परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Facebook
0 Comments