खडकी, ता. रिसोड, जि. वाशिम | प्रतिनिधी
ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, खडकी (ता. रिसोड, जि. वाशिम) येथील मार्गदर्शक डॉ. ज्ञानेश्वर सदार पाटील व त्यांच्या जीवनसाथी सौ. स्वाती ज्ञानेश्वर सदार (अध्यक्षा) यांनी अवयवदान व देहदान करण्याचा प्रेरणादायी निर्णय घेतला आहे.
गेल्या २० वर्षांपासून वैद्यकीय व सामाजिक सेवेत कार्यरत असलेल्या या दाम्पत्याने समाजात जनजागृती व्हावी या उद्देशाने हा संकल्प जाहीर केला. रक्तदान हे जीवनदान आहे तसेच नेत्रदानामुळे एखाद्या व्यक्तीला नवे जग पाहता येते, या भावनेतून त्यांनी पुढे जाऊन अवयवदानाचा निर्णय घेतला.
डॉ. पाटील यांनी सांगितले की, अवयवदानासाठी आवश्यक असलेले दोन साक्षीदार म्हणून त्यांनी पत्नी सौ. स्वाती सदार, मुलगी डॉ. शिवानी व भाऊ संदीप यांना माहिती दिली. सर्वांच्या संमतीनंतर त्यांनी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण केली.
त्यांनी जनतेला आवाहन केले की, “मृत्यूनंतर शरीर राख होते; परंतु आपल्या अवयवांमुळे इतरांना जीवन मिळणार असेल तर याहून मोठे पुण्य नाही. समाजात जागृती करून आपण लाखो लोकांचे प्राण वाचवू शकतो.”
अवयवदानाचे महत्त्व
अवयवदानामुळे मृत्यूनंतर ८ ते ९ जणांचे प्राण वाचू शकतात. हृदय, किडनी, यकृत, फुफ्फुसे, नेत्र यांसारखे अवयव गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात.
“मृत्यूनंतरही समाजासाठी उपयुक्त ठरणे, हीच खरी मानवसेवा आहे.”
प्रतिनिधी
📲 UBN Live News
🎙️ आवाज महाराष्ट्राचा

Facebook
0 Comments