प्रतिनिधी स्वाती गायकवाड
मांगुळ झनक येथे लहु गर्जना ग्रुपच्या नेतृत्वाखाली नवरात्री उत्सवानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, त्यांच्यातील कल्पकतेला वाव मिळावा आणि विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने प्रकल्प बनविण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या उपक्रमांतर्गत कृणाल आनंथा अंभोरे या विद्यार्थ्याने पवनचक्कीचा प्रकल्प तयार केला, तर कृणाल रवींद्र अंभोरे या विद्यार्थ्याने मिसाईलचा प्रकल्प बनवून सादर केला. यावेळी मा. रोहित ब्रम्हदेव वारे यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून मांगुळ झनक येथील नागरिकांना अंतराळ तंत्रज्ञान, रॉकेट निर्मिती आणि गुणवत्ता नियंत्रण या विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच नवरात्रीच्या प्रकल्प उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेचे कौतुक केले.
अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रात रोहित वारे यांचे योगदान
रोहित ब्रम्हदेव वारे हे भारतातील अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रातील Skyroot Aerospace Pvt. Ltd. या कंपनीमध्ये कार्यरत आहेत. ही कंपनी उपग्रह प्रक्षेपणासाठी आधुनिक रॉकेट तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम करते. वारे हे कंपनीच्या गुणवत्ता विभागात (Quality Department) कार्यरत असून, Launch आणि Non-Launch प्रकल्पांमध्ये योगदान देतात. त्यांच्या कामामध्ये Composite Material Layup, प्रक्रिया तपासणी, गुणवत्ता नियंत्रण, तांत्रिक रेखाचित्रांनुसार तपासणी आणि उत्पादनाची गुणवत्ता सुनिश्चित करणे यांचा समावेश आहे.
त्यांना कंपनीच्या Vikram-1 या ऑर्बिटल रॉकेट प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळाली आहे. या रॉकेटचा उद्देश लहान उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपित करणे हा आहे. प्रत्येक कामात गुणवत्ता, अचूकता, सुरक्षितता आणि निर्धारित प्रक्रियांचे पालन करणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे वारे यांनी सांगितले.
यावेळी पवन कांबळे यांनी पवनचक्कीच्या साहाय्याने वाऱ्याच्या ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा कशी निर्माण होते, याची माहिती दिली. तर रोहित ब्रम्हदेव वारे यांनी मिसाईल आणि अंतराळ तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रातील करिअरच्या संधींबाबत प्रेरणा दिली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनाची आवड आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी लहु गर्जना ग्रुपचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता प्रत्यक्ष प्रयोग आणि प्रकल्पांच्या माध्यमातून शिकावे, तसेच पालकांनीही मुलांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन ग्रुपच्या वतीने करण्यात आले.
“ग्रामीण भागातील मुलांमध्येही वैज्ञानिक होण्याची क्षमता आहे. योग्य मार्गदर्शन, संधी आणि प्रोत्साहन मिळाल्यास ही मुले भविष्यात विज्ञान व अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी कामगिरी करू शकतात,” हा संदेश या उपक्रमातून देण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा