Top News

सह्याद्री रडू लागला ढसा ढसा!

 सह्याद्री रडू लागला ढसा ढसा!


सह्याद्रीच्या डोंगररांगा रडू लागल्या ढसा ढसा,

वृक्षांच्या त्या हिरव्या रांगा तुटू लागल्या जेव्हा!

ओसाड दिसती आज ती झाडे, कधीकाळी हिरवीगार होती,

वेदनेने त्या झाडांवरील पक्षी सारे पळू लागले!


का गमवता निसर्गाचा ठेवा,

जो मिळाला कसा बसा?

तो खचताना पाहून सह्याद्रीचे डोंगर,

रडू लागले ढसा ढसा!


का कळेना पामराला त्या निसर्गाच्या सान्निध्याचे,

उंच इमारती, आलिशान बंगले, यातच मग्न तो!

काय कळेल त्याला मूल्य निसर्गाच्या इतिहासाचे?


कधी मुसळधार पाऊस, कधी सैराट वारा, कधी नापिकी,

तर कधी सुनामीच्या लाटा!

निसर्गाचा वारसदार जेव्हा झाडे तुटताना हसू लागला,

त्या स्वार्थी माणसाला पाहून सह्याद्रीचा डोंगर

ढसा ढसा रडू लागला!


पर्यावरणाची राखरांगोळी होईल जेव्हा पुन्हा पुन्हा,

जन्म घेतील चंडीप्रसाद, गौरा देवी, सुंदरलाल बहुगुणा!

अदाणी असो वा अंबानी, असो कोणी मेहता,

शिवरायांच्या कर्मभूमीचा असा का अंत पाहता?


उठा गड्यांनो, जागे व्हा, मावळे होऊन शिवरायांचे,

बाजीप्रभूंसारखी ढाल बनूया, रक्षण करूया सह्याद्रीचे!

विकले गेले इमान आमचे, विकून टाकली माती,

विकास केला सांगत फिरता, उघडी करून छाती!


पशू, पक्षी, जलचर प्राणी स्वतःशीच बोलू लागले,

निष्ठुर माणसाने तोडले घरटे, ते सैरावैरा पळू लागले!

जंगलात शिकार मिळेना, ते माणसालाच गिळू लागले,

नाइलाजाने ते माणसाशी माणुसकीने मिळू लागले,

मानवजातीशी नाते तुटताना ते ढसा ढसा रडू लागले!


होईल जेव्हा अमाप हिंसा, तुटतील अमाप जंगल ,

होईल अंत पर्यावरणाचा, सर्वत्र पसरेल अमंगल!

बंद करा हा अंत उद्याचा, ते जीव तोडून सांगू लागले,

स्वतःच्याच हाताने का संपवता स्वतःला?

पैशाच्या भुरळीने का असे भुलू लागले?


सह्याद्रीचे डोंगर पाहून ही व्यथा,

ढसा ढसा रडू लागले!


✍️ कवी – महादेव आवारे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने