वाशीम:प्रतिनिधी
वाशीम जिल्ह्याची जीवनवाहिनी समजली जाणारी पैनगंगा नदी यंदा अत्यंत कठीण टप्प्यातून जात असून, नदीचे पात्र बहुतांश भागात सुकलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. पाण्याचा प्रवाह पूर्णपणे खंडित झाल्याने नदीपात्रात ठिकठिकाणी खडक आणि वाळूचे पट्टे उघडे पडले आहेत. ऐन हंगामातच प्राण वाहिनी कोरडी पडल्यामुळे ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यासह शेतीचा प्रश्न गंभीर बनला आहे.
पैनगंगा नदीवर वाशीम जिल्ह्यातील अनेक गावांची पिण्याच्या पाण्याची तसेच सिंचनाची सोय अवलंबून आहे. मात्र, यंदा पावसाचे असमान प्रमाण आणि उन्हाचा वाढता पारा यांमुळे नदीपात्रातील पाणी झपाट्याने आटले आहे. ज्या नदीच्या पाण्यावर हजारो एकर शेती फुलत होती, तीच नदी आज पाण्यासाठी आसुसलेली दिसत आहे.
शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर
नदी सुकल्यामुळे काठावर वसलेल्या गावांमधील विहिरी आणि बोअरवेलची भूजल पातळी कमालीची खाली गेली आहे. परिणामी, अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. सोबतच, रब्बी पिकांना शेवटचे पाणी देणे शेतकऱ्यांना अशक्य झाले असून उभी पिके डोळ्यांदेखत वाळू लागल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे.
प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजनेची मागणी
स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांकडून प्रशासनाने या समस्येकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. "पैनगंगा कोरडी पडल्याने आमच्यासमोर पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चार्याचा आणि पाण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे," अशी व्यथा स्थानिक ग्रामस्थांनी मांडली.
नदीपात्रातील पाण्याचे योग्य नियोजन करणे, वरच्या भागातील धरणांमधून पाणी सोडणे आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करणे अशा तातडीच्या उपाययोजना प्रशासनाने राबवाव्यात, अशी जोरदार मागणी आता वाशीम जिल्ह्यातून जोर धरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा