Top News

विद्यार्थी विकासाच्या समर्पित कार्याचा गौरव .

 डॉ. रविंद्र मडावी यांना उत्कृष्ट विद्यार्थी विकास अधिकारी पुरस्कार.

वाशिम : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत राहून त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारे श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय, वाशिम येथील विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. रविंद्र मडावी यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा “उत्कृष्ट विद्यार्थी विकास अधिकारी पुरस्कार”विविध सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
        युवा महोत्सव‘युवा संस्पर्श–२०२६' अंतर्गत आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते आणि बुलढाणा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते डॉ. रविंद्र मडावी यांचा गौरव करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बुलढाणा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
       विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी डॉ. रविंद्र मडावी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहेत. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांच्यात नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव विकसित व्हावी, यासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या या समर्पित आणि विद्यार्थी-केंद्रित कार्याची दखल घेत विद्यापीठाने त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान केला.
      विद्यार्थी विकास विभागाच्या विविध उपक्रमांना संस्थेचे अध्यक्ष मनोजभाऊ कोठारी, सचिव राहुलभाऊ कोठारी आणि आशिषभाऊ कोठारी यांचे वेळोवेळी मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे विद्यार्थी विकास विभागाच्या कार्याला अधिक प्रभावी दिशा मिळाली.
       डॉ. रविंद्र मडावी यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. अतुल राऊत, प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. हा पुरस्कार मिळवून देण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंदांनी विशेष सहकार्य केले तसेच अथक परिश्रम घेतले.
      विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या डॉ. रविंद्र मडावी यांच्या कर्तृत्वाचा हा गौरव निश्चितच प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने