Top News

यवतमाळ : अडाण नदीच्या पुरात कार वाहून गेल्याने आई व दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू, वडीलांचा जीव वाचला.

 

UBN Network :
यवतमाळ, 31 जुलै : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील लोणी येथील रहिवासी अविनाश नामदेव खंडारे यांच्या कुटुंबावर अत्यंत दुःखद प्रसंग ओढवला आहे. गुरुवार (दि. 30 जुलै) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास लोणी–दारव्हा मार्गावरील दहिली गावाजवळील अडाण नदीच्या पुलावरून त्यांची एर्टिगा कार पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कारमध्ये अविनाश खंडारे, त्यांची पत्नी आणि दोन मुली प्रवास करत होत्या. कार पुराच्या प्रवाहात वाहून जात असताना अविनाश खंडारे नदीकाठावरील एका झाडाला धरून बचावले. त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना सुरक्षित बाहेर काढले.
यानंतर तातडीने शोधमोहीम राबविण्यात आली. शोधादरम्यान अविनाश खंडारे यांच्या पत्नी आणि दोन मुलींचे मृतदेह आढळून आले. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या दुर्घटनेतील तिन्ही मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
नागरिकांना आवाहन : राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळावा. पूर आलेले नदी-नाले, पूल किंवा पाण्याखाली गेलेले रस्ते ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. स्वतःच्या सुरक्षिततेबरोबरच आपल्या कुटुंबियांचाही विचार करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने